कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारतीय हवामान विभागाने पुण्यासह राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. येत्या १२ जूनपासून मान्सून सक्रिय होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. विशेषतः दुपारनंतर आणि संध्याकाळी पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे.
अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसाने काही दिवस राज्याला झोडपून काढले. मात्र त्यानंतर अचानक पावसाने दडी मारली. शेतकरी, सामान्य नागरिक आणि पाणी साठ्यांवर अवलंबून असलेले सर्वच जण चिंतेत होते. मात्र आता दिलासादायक बातमी आहे. लवकरच राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय होणार असून पावसाने आपली चाहुल दिली आहे.
ताज्या अंदाजानुसार, येत्या तीन ते चार दिवस राज्यात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह कोकण भागातही पावसाचा जोर राहील. १३ जूनपासून मान्सूनला विशेष बळ मिळणार असून पावसाची व्याप्ती हळूहळू संपूर्ण राज्यात वाढणार आहे.
या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना गती मिळेल. आधीच खोळंबलेल्या मशागत पेरणी आणि उभ्या पिकांना खतांची मात्रा देणे या कामांना गती मिळणार आहे. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून खरीप हंगामाची चांगली सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाणवठे, नाले, नद्या पुन्हा भरतील आणि भूजल पातळीतही वाढ होईल.
दरम्यान, हवामान विभागाने नागरिक व शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. आवश्यक असल्यास शेतीच्या कामासाठी वेळ निवडताना पावसाचा अंदाज लक्षात घ्यावा, असेही सांगण्यात आले आहे.
———————————————————————————————-



