कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ ‘दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. आपले सर्व देव देवता निसर्गाशी साधर्म राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणारे आहेत. निसर्गाची सेवा केल्याशिवाय आपला नमस्कार कोणत्याच देवतांपर्यंत पोहोचत नाही.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी चांगल्या प्रकारे मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला असून २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्यस्तरीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा अशी मागणी आली आहे, आणि ती येत्या काळात पूर्ण करू अशी ग्वाही देण्यात आली आहे. आमदार कोरे यांनी केलेल्या दुसऱ्या मागणीप्रमाणे या विकास आराखड्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फतच होण्यासाठी लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी ऑनलाइन बोलताना दिली.
ते म्हणाले, श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर अनेक भाविक येतात त्यांची चांगली सोय व्हावी तसेच येथील वातावरणही उल्हासित रहावे या दृष्टीनेच विकास आराखड्याची चांगली अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. पन्हाळगडावरील झालेल्या चांगल्या कामाप्रमाणेच याही विकासाराखड्यातून आमदार कोरे तसेच स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी चांगले काम करतील आणि यासोबत निश्चितच शासन पूर्णपणे पाठीशी राहील असे ते म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा देऊन समाज जीवन सुरळीत चालण्यासाठी इथिक्स, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी आणि एनवोर्मेन्ट या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०७० सालापर्यंत भारत देश कार्बन न्यूट्रल देश करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पर्यावरणपूरक कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरण विषयक महत्त्व पटवून दिले. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या.
आपल्या मनोगतामध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दख्खन केदारण्य या प्रकल्पास शुभेच्छा देऊन या पद्धतीने जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विविध विकास प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यासंदर्भात उपस्थित मान्यवरांचे आभार मानून विकास आराखडा शास्त्रीय दृष्टिकोनातून, पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर सांगितले.
उपस्थिती – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन तर कार्यक्रमस्थळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ.विनय कोरे, आमदार अशोकराव माने यांच्यासह जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेन, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.कदम, प्रांताधिकारी समीर शिंगटे व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————————————————————-