spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeआरोग्यचला, सायकल वापरूया : आरोग्य, पर्यावरण आणि भविष्य सुरक्षित करूया!

चला, सायकल वापरूया : आरोग्य, पर्यावरण आणि भविष्य सुरक्षित करूया!

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

सायकल हे पर्यावरणात अडथळा न आणणारे वाहन आहे.  या वाहनामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही कि आरोग्याची तक्रार. हे वाहन जसे निसर्गपूरक आहे तसेच ते आरोग्य संवर्धकही आहे. या वाहनामुळे वाहतुकीचा खोळंबा होत नाही की पार्किंगची समस्या उद्भवत नाही. या वाहनासाठी कोणत्याही प्रकारचे इंधन किंवा वीज किवा वायू लागत नाही कि ही वाहन चालविण्यासाठी पैसे लागत नाहीत. इतके सोयीचे आणि शून्य प्रवास खर्च असलेले सायकल हे वाहन असूनही पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. याचबरोबर सायकलीचा शोध हा माणसाचा असा एकमेव शोध आहे कि त्याचे कसलेही दुष्परिणाम नाहीत. आज ३ जून सायकल दिवस आहे, यानिमित्त आपल्या जीवनात सायकलीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा खास लेख.

चालताना पायांची वक्राकार हालचाल होते. माणसाची अन्य प्राण्यांपेक्षा एकसारखे चालणे आणि पळणेची क्षमता जास्त आहे. पायाच्या वक्राकार हालचालीच्या अभ्यासातूनच चाकाचा शोध लागला. पुढे चाकांचा वापर सायकलीसाठी केला गेला. सायकलीचा अर्थच चक्र असा आहे. माणूस जर जास्तीत जास्त दिवसाला शंभर किलोमीटर पायी चालू शकतो तर तो दिवसाला ४०० ते ५०० किलोमीटर सायकल चालवू शकतो. अगदी सर्वसामान्य माणूस सहज न थकता दिवसाला ३० किलोमीटर सायकल चालवू शकतो. हे आपल्याला माहितच नाही. यामुळे इतकीही सायकल चालविण्याविषयी माणसाच्या मनात भीती आहे. वास्तविक सायकल चालविण्यामुळे पर्यावरण, शारीरिक व मानसिक आरोग्य, वाहतुकीचा खोळंबा असे आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न सुटतील. याचा उहापोह या लेखात केलाच आहे. 

सायकलचा शोध १९व्या शतकात लागला. सायकलच्या विकासातील टप्पे असे : 

ड्राइसेन / रनिंग मशीन 
जर्मनीतील कार्ल वॉन ड्रायस यांनी १८१७ मध्ये सर्वप्रथम सायकलसदृश वाहनाचा शोध लावला. त्याला ड्रायसीन किंवा लाफिंग मशीन असे म्हणतात. या वाहनाला पेडल नव्हते आणि चालवण्यासाठी चालावे लागायचे.

पेडल लावलेली सायकल (व्हीलोसिपेड) 
फ्रान्समधील पिअरे मिचॉक्स आणि त्याचा मुलगा इरणेस्ट मिचोक्स यांनी १८६० च्या सुमारास, पहिल्यांदा समोरच्या चाकावर पेडल लावले. हिला बोन्सिकर असेही म्हणत.

हाय व्हील सायकल –
 इंग्लंडमध्ये जेम्स स्टरलेने १८७० च्या दशकात मोठ्या समोरच्या चाकाची सायकल तयार केली, जी अधिक वेगवान होती. याला पेंनी फ्र्थिंग असे म्हटले जायचे.

सेफ्टी बायसिकल  –
जॉन केम्प स्टरलने १८८५ मध्ये,  पहिली “सेफ्टी बायसिकल” तयार केली – दोन समसमान चाकं, चेन ड्राइव्ह आणि ब्रेक यांसह. या स्वरूपाची सायकल आपल्याला आज दिसते. या सायकलीला क्लासिक सायकल किवा घोडा सायकल असेही म्हणतात.

 सायकलीचे जीवनातील महत्त्व :

पर्यावरणपूरक वाहन – सायकल ही इंधनविरहित आणि प्रदूषणमुक्त वाहन आहे. ती चालवताना कोणतेही प्रदूषण होत नाही, त्यामुळे सायकल पर्यावरणासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
आरोग्यासाठी लाभदायक – सायकल चालवणे ही एक उत्तम व्यायामपद्धती आहे. नियमित सायकलिंग केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते, स्नायूंना बळकटी मिळते, आणि वजन नियंत्रणात राहते. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजारांपासून दूर राहता येते.
आर्थिकदृष्ट्या सुलभ – सायकल ही कमी खर्चिक वाहतूक साधन आहे. पेट्रोल किंवा डिझेल लागणारे, वीज लागणारे, वायू लागणारे वाहन विकत घेण्याऐवजी सायकल ही एक स्वस्त, देखभाल कमी लागणारी पर्याय आहे.
वाहतूक कोंडीतून सुटका – शहरी भागांमध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीपासून सुटका करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे सायकल. ती लवकर आणि सहज नेऊ शकतो.
मानसिक आरोग्यास फायदेशीर –  सायकल चालवताना मनाला शांती मिळते. नैसर्गिक हवेत, शांततेत सायकलिंग केल्याने मानसिक तणाव दूर होतो आणि एकाग्रता वाढते.
सतत हालचालीसाठी प्रेरणा – सायकल चालवणे ही सतत हालचाल असते. त्यामुळे एका जागी बसून राहण्याची सवय कमी होते, जी आधुनिक जीवनशैलीमधील अनेक आजारांचे कारण असते.
सामाजिक आणि सामूहिक सहभाग – सायकल रॅली, पर्यावरण जनजागृती अभियान यामध्ये सायकलचा वापर केल्याने समाजात एक सकारात्मक संदेश दिला जातो. ही एक सामाजिक एकजूट साधणारी साधनादेखील ठरते.

सायकलचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये खालील देशांचा समावेश होतो:

नेदरलँड्स : या देशाचा सायकल वापरामध्ये जगात पहिला क्रमांक आहे. राजधानी अ‍ॅम्स्टरडॅममध्ये लोकसंख्येपेक्षा अधिक सायकली आहेत. रोजच्या दैनंदिन जीवनात – कामावर जाणे, शाळा, बाजार – साठी लोक सायकल वापरतात. सायकलसाठी विशेष रस्ते, पार्किंग आणि धोरणे आहेत.
डेनमार्क : कोपनहेगन हे शहर “सायकल फ्रेंडली सिटी” म्हणून ओळखले जाते. तेथे सायकल चालवणे ही सामान्य जीवनशैलीचा भाग आहे. हवा स्वच्छ ठेवण्यासाठी आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं.
जर्मनी : अनेक शहरांमध्ये सायकल चालवण्यासाठी चांगल्या सुविधा आहेत. लोक आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल वापरतात.
जपान :  या देशातील शहरांमध्ये सायकलचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सायकल पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध आहेत.
चीन : एकेकाळी जगातील सर्वात जास्त सायकल वापरणारा हा देश होता. या देशात सध्या इलेक्ट्रिक सायकलींचा वापरही वाढत आहे.
भारत : भारतीय विज्ञान संस्थेच्या (IISc) एका अभ्यासानुसार, भारतात सुमारे १७० दशलक्ष (१७ कोटी) सायकल वापरकर्ते आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८३ टक्के कुटुंबांकडे सायकल आहे, तर बिहारमध्ये ६९टक्के  कुटुंबांकडे सायकल आहे. 
पुणे शहराला पूर्वी “सायकल सिटी” म्हणून ओळखले जात होते. अलीकडच्या वर्षांत, मोटरसायकल्स आणि कार्सच्या वाढत्या संख्येमुळे सायकल वापरात घट झाली आहे. तथापि, सायकल शेअरिंग योजना आणि नवीन सायकल ट्रॅक्सच्या माध्यमातून सायकलिंगला पुन्हा चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सायकलीचे प्रकार :

क्लासिक सायकल : ही सायकल रेग्युलर सायकल आहे. या सायकलीला ग्रामीण भाषेत घोडा सायकल असेही म्हणतात. ही सायकल सर्व दृष्टने सोयीची आहे. ही सायकल प्रवास करण्यास हलकी तितकीच मजबूत आहे. ओझे वाहण्यासाठी दणकट देखील ही सायकल आहे. देखभाल खर्च अत्यंत कमी आहे.
हायब्रिड सायकल : सर्वसामान्य आरोग्य राखण्यासाठी ही सायकल सर्वोत्तम. रस्ता व थोडेफार खडबडीत मार्ग दोन्हींसाठी योग्य. पाठ व मान यांच्यावर कमी ताण येतो. सुरुवात करणाऱ्यांसाठी उत्तम. वजन कमी करणे, कार्डिओ फायदे मिळवणे यासाठी उपयोगी.
रोड सायकल : फिटनेस व कार्डिओ क्षमतावाढीसाठी. ही सायकल वेगाने चालते, लांब पल्ल्यासाठी चांगली. नियमित व्यायाम करणाऱ्यांना उपयुक्त. पायांची ताकद वाढवते. कमी वजनाची असल्यामुळे सांध्यांवर कमी ताण.
एम. टी. बी. – माउंटन बाईक : थोडा अ‍ॅडव्हेंचर/ऊबडधूबड मार्गांसाठी. खडबडीत, चढउतार असलेल्या भागांसाठी उपयुक्त. स्नायूंचा जास्त व्यायाम होतो. फिटनेससाठी प्रभावी पण सुरुवातीला थोडी कठीण.
स्टेशनरी सायकल :  घरीच व्यायाम करणाऱ्यांसाठी. वयस्कर व्यक्ती किंवा सांधेदुखी असणाऱ्यांसाठी चांगली. हवामानाचा अडथळा नाही. वजन नियंत्रण, कार्डिओ, आणि रिहॅबिलिटेशन साठी उपयोगी.

सायकल हे केवळ एक वाहन नाही, तर आरोग्य, पर्यावरण आणि अर्थकारण यांचा समतोल साधणारे जीवनशैलीचे साधन आहे. सायकल दिन हा फक्त साजरा करण्यापुरता मर्यादित न ठेवता, आपण दररोज सायकलचा वापर करून अधिक निरोगी आणि हरित जीवनाकडे वाटचाल करू शकतो.

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments