मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यात पतीसह सासरच्या जाचांमुळे पाच महिन्यांत ४७३६ महिलांचा प्रंचड मानसिक, शारीरिक छळ झाला आहे. मुंबई, छ. संभाजीनगर, पुणे, बीड, नाशिक आदी भागांत लाडक्या बहिणींचा श्वास कोंडत आहे. विशेष म्हणजे प्रतिदिन ३५ महिला आपले जीवन संपवत असल्याचे भीषण वास्तव शिवसेनेना ठाकरे पक्षाने आकडेवारी सहित उघडकीस आणले आहे. मात्र, याबाबत महिला आयोग व सरकारने अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
पुण्यातील भुकूम येथील कस्पटे यांची मुलगी वैष्णवी हगवणे हिचा पतीसह सासरच्या जाचामुळे बळी गेला. राज्यातील विवाहित महिलांचा सासरकडून होणारा छळ त्यानंतर प्रकाश झोतात आला. तरीही न्यायप्रविष्ट प्रकरण, पोलीस ठाण्यात दखल घेतली जात नाही. विरोधकांनी यावरून सरकारला घेरले. महिला आयोगावर ही टीकेची झोड उठवली गेली. प्रशासकीय स्तरावर या विरोधात कठोर पावले उचलणार, अशी ग्वाही देण्यात आली. परंतु, विवाहितांच्या छळाचे प्रकार दिवसेंदिवस सुरूच आहेत.
मागील पाच महिन्यांत ४७३६ विवाहितांना सासूरवास सोसावा लागल्याने त्यांनी जीवन संपवल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला उपनेत्या किशोरी पडणेकर यांनी केला. राज्यातील विवाहितांच्या छळाची आकडेवारी जाहीर केली. सर्वाधिक मुंबईत- ४१२ विवाहित महिलांनी आत्महत्या केली. त्या खालोखाल छत्रपती संभाजी नगर- २८८, बीड- २४३, नाशिक- २३७, पुणे- २२९, अहिल्यानगर जिल्ह्यात – १९६, धुळ्यात- १८१, जालना -१८०, नांदेड- १७५ आणि नागपूरमध्ये -१२१ विवाहितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रतिदिन सरासरी ३५ विवाहित महिलांना जाच सहन न झाल्याने जीवाचे बरेवाईट केल्याचा शिवसेना ठाकरे पक्षाचा आरोप आहे.
सासरच्यांनी घर बांधायला किंवा नवीन घर, नवीन गाडी घ्यायला, कर्ज फेडायला, व्यवसाय टाकायला, आदी कारणांसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा लावला. विवाहात दागिने, महागड्या वस्तू दिल्या नाहीत म्हणून छळ केला. वंशाला दिवा नाही. माहेरच्या शिकवणीमुळे विवाहिता सासरी वावरते, असा आरोप होतो. अनेकदा तिला जाचक शब्द वापरले जातात. सासरकडील विशेषत: विवाहितेची नणंद, सासू तिच्या पतीच्या मनात काहीतरी भरवल्याने वाद होतात. परिणामी संशय घेऊन मारहाणीपासून जीव घेण्यापर्यंतच्या तक्रारी पोलिसांकडे बहुतेक विवाहितांनी नोंदवल्याचे दिसून येते.
कायद्याचा धाक नाही –
लग्नावेळी मुलाकडून किंवा मुलीकडून हुंडा घेऊ नये, हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. परंतु, राज्यात या कायद्याचा धाक राहिलेला नाही. वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर आजही सोने, महागड्या वस्तू, वाहने, पैसे अशा स्वरूपात हुंडा घेण्यासाठी सासरच्या मंडळींकडून जाच सुरू असल्याचे पोलिसांत दाखल तक्रारींवरून हे स्पष्ट होते.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या विवाहित महिलांना कोणताही त्रास झाला तरी त्या दखल घेत नाहीत. उलट राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करण्यात धन्यता मानतात. या पदावर राहण्याचा त्यांना अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अशा अध्यक्षांना पदावरून दूर करावे. – किशोरी पेडणेकर ( उपनेत्या, शिवसेना ठाकरे पक्ष )
—————————————————————————————