कोल्हापूर :प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून पाऊस सुरु आहे. वास्तविक मान्सूनपूर्व पाऊस इतका दीर्घकाळ टिकत नाही मात्र काल पासून सुरु झालेला पाऊस आज परत वाढला आहे. आजून तीन दिवस असाच पाऊस राहणार असा हवामान विभागाचा अंदाज आहे. अचानक सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मशागतीची कामं थांबली आहेत शिवाय उन्हाळी पिकं पावसामुळे शेतात कुजू लागली आहेत. हा पाऊस आणि आधी झालेल्या वळवाच्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील राजापूर बंधारा आणि कसबा बावडा येथील राजाराम बंधारा पाण्याखाली गेला आहे. याशिवाय जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी इंचां इंचाने वाढत आहे. यामुळे अनेक बंधारे सायंकाळ पर्यंत समतल पातळीवर आहेत.
वातावरणातील बदलामुळे कधी नव्हे ते मे महिन्यात मान्सून पूर्व पाऊस इतक्या जोरात पडत आहे. यावर्षीच्या फेब्रुवारी पासूनच कडक उन्हाळा जाणवत होता. मार्च, एप्रिलमध्ये तर उष्णतेने कहर केला. ‘आत्ताच असं तर मे मध्ये कसे’ अशी चर्चा नागरिकांच्यात होती. मे च्या पहिल्या आठवड्यात तापमान ४० अंश सेल्सिअस पर्यंत गेले. असाच काही दिवस उकाडा राहिला आणि मग मात्र ढग यायला लागले. सोसाट्याचा वारा वाहू लागला. विजा चमकू लागल्या. आणखी दोन दिवसांनी पाऊस सुरु झाला. पाऊस व्हायचा मात्र उष्णता कमी व्हायची नाही. परत पाऊस यायचा. जरा हवेत गारवा पसरतोय तोपर्यंत परत कालपासून जोरदार पाऊस सुरु झाला. आज परत पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे नद्यांची पाणी पातळी इंचाइंचाने वाढत आहे.
शेतकरी रब्बी हंगामाची जोरदार तयारी करत होता. आंब्याचा, कलिंगडचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला होता. आणि हा पाऊस सुरु झाला. शेती मशागतीची कामे शेवटच्या टप्प्यात आली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्याचे काम ठप्प झाले आहे. ‘वरुणराजा आता बस बळीराजाला हवीय घात’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. हा पाऊस थांबल्यानंतर किमान दहा दिवस घात यायची वाट पहावी लागेल. पेरणी झाल्यानंतर पावसाची वाट पहावी लागेले ते वेगळेच.






