पन्हाळा प्रतिनिधी : प्रसारमाध्यम न्यूज
ऐतिहासिक महात्म्याबरोबरच थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे पन्हाळा हे पर्यटन स्थळ असलेल्या पन्हाळगडाला पर्यटकांची पहिली पसंती असते त्यामुळेच गडावर नेहमीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. सध्या मे महिन्याची सुट्टी आणि त्यातच मान्सूनपूर्व पावसाने धुक्याने वेढालेल्या पन्हाळ्याचे नयनरम्य सौदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची पन्हाळगडावर गर्दी होऊ लागली आहे. या वाढत्या गर्दीमुळे व्यवसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
पन्हाळगड हे कोल्हापूर शहराच्या सर्वाधिक जवळचे, सह्याद्रीच्या कुशीतील सर्वोत्तम थंड हवेचे तसेच निसर्गरम्य ठिकाण आहे. भक्कम तटबंदीच्या चिरेबंदी कोंदणातील भव्य ऐतिहासिक इमारती, थंड हवेचा आल्हाददायक गारवा, पर्वतरांगांचा विहंगम नजारा, तबक आणि नेहरु उद्यानांतील गगनचुंबी सदाहरित वृक्षांवरील पक्ष्यांच्या कर्णमधुर किलबिलाट, कासारी तसेच वारणा नदीच्या खोऱ्यांमधील अमर्याद नेत्रसुखद निसर्ग सौंदर्य टिपण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक पन्हाळा गडाला भेट देत असतात. येथील तीन दरवाजा, अंधारबाव, सज्जाकोठी, धान्याचे कोठार, पुसाटी बुरूज परिसर, तबक उद्यान, लता मंगेशकर बंगला परिसर, आकाशवणी टॉवर परिसर, पावनगड, रेडेघाट येथे पर्यटकांचे जथ्थेच्या जथ्थे पाहावयास मिळत आहेत.
भाजलेले व उकडलेले कणीस, पाणीपुरी, भेळ, रगडा, मिसळ, झुणका भाकर या खाद्यपदार्थांवर ताव मारताना पर्यटक दिसत आहेत. गडावर पर्यटकांनी केलेल्या गर्दीमुळे लहान-मोठे व्यवसाय तेजीत सुरू आहेत.
शिवतीर्थ उद्यान पर्यटकांचे आकर्षण
नगरपालिकेने नव्याने सुरू केलेले शिवतीर्थ उद्यानसुद्धा पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. विविध प्राण्यांच्या प्रतिकृती, मुद्रा प्रतिकृतीत असणारा रंगीबेरंगी कारंजा, सेल्फी पॉईंट, लहानांसाठी खेळणी, टाकाऊ वस्तु पासून बनवलेल्या प्रतिकृती, विविध प्रकारची फुले , बदक, मासे, लव्हबर्डस , वृद्धांसाठी निवाऱ्याची सोय असलेले प्रशस्त शिवतीर्थ उद्यान सायंकाळी पर्यटकांची गर्दी खेचत आहे.



