कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालया अंतर्गत कार्यरत ‘माय भारत’ या उपक्रमात देशभरातील तरुणांना ‘नागरी संरक्षण स्वयंसेवक’ म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उपक्रमाचा उद्देश – नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आपत्कालीन परिस्थिती आणि इतर अनपेक्षित संकटांच्या वेळी मदतीसाठी एक प्रशिक्षित, सज्ज आणि लवचिक स्वयंसेवक दल उभारणे हा आहे. या स्वयंसेवकांकडून बचाव कार्य, प्रथमोपचार, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन, पुनर्वसन आदी महत्त्वाच्या सेवा अपेक्षित असणार आहेत.
सध्याच्या काळात उद्भवणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी एक सक्षम समुदाय-आधारित यंत्रणा उभारण्याची गरज आहे. यासाठी ‘माय भारत’ तर्फे युवा स्वयंसेवकांच्या नेटवर्कला बळकटी देण्याचे काम सुरू आहे. स्वयंसेवकांना केवळ नागरी जबाबदारीची जाणीव करून दिली जाणार नाही, तर त्यांना जीवनरक्षक कौशल्यांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. त्यामुळे देशसेवेच्या संधीसोबतच प्रत्यक्ष उपयोगी ठरणारे ज्ञानही त्यांना मिळणार आहे.
नोंदणी प्रक्रिया –
* ‘माय भारत’च्या अधिकृत पोर्टलवर https://mybharat.gov.in उपलब्ध आहे.
* इच्छुक युवकांनी त्वरित नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी यांनी केले आहे.
* अधिक माहितीसाठी ‘माय भारत’ कोल्हापूर कार्यालयाशी ०२३१-२५४८९९९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
———————————————————————————————–