अहिल्यानगर : प्रसारमाध्यम न्यूज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चरित्रपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली चोंडी-अहिल्यानगर येथे झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीत या चित्रपटाच्या निर्मितीस मंजुरी देण्यात आली. त्यामुळे पहिल्यांदाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे अवघे आयुष्य शौर्यपूर्ण आणि प्रेरणादायी असून विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य आजही उत्कृष्ट कार्याचा मापदंड ठरले आहे. या चरित्रपटाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा व्यापक प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार असून, महाराष्ट्राची सांस्कृतिक समृद्धी अधोरेखित होणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाकडे देण्यात आली आहे.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावरील हा चित्रपट व्यावसायिक दर्जाचा असल्यामुळे त्यासाठी आवश्यक असलेला संपूर्ण खर्च राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय मागण्यांतून उपलब्ध करून देण्यात येणार असून छाननी समिती व निवड समिती यांच्यामार्फत विहित कार्यपद्धतीनुसार दिग्दर्शक किंवा निर्मिती संस्था यांची निवड करण्यात येणार आहे.
अहिल्यानगर येथील चौंडी या अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळावरून त्यांच्या त्रिशताब्दीनिमित्त राज्य शासनाने मंगळवारी मोठी घोषणा केली. त्यांच्या कार्याचा संपूर्ण जगाला परिचय व्हावा यासाठी या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. हा केवळ जीवनपट नसेल तर त्यांच्या कार्याची प्रभावीपणे मांडणी यात करण्यात येईल. असेही यावेळी सांगण्यात आले.
——————————————————————————————