spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeमाहिती तंत्रज्ञानआजचा दिवस शब्दांचा : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

आजचा दिवस शब्दांचा : जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन

प्रसारमाध्यम डेस्क

“अगं, पेपर आलाय का ?” “हो गं, पण त्यात लिहिलंय काय  – पुन्हा तेच भ्रष्टाचार, आरोप, घोटाळे, आंदोलने…” ”या पेपरमध्ये असतं तरी दुसरं काय ?” ”आणि याच्या शिवाय जमत ही नाही ”

दररोज सकाळी घराघरातून असा संवाद ऐकायला मिळतो. वर्तमानपत्र हे केवळ बातम्यांचं माध्यम नाही, तर आपल्या समाजाचा आरसाच आहे. आणि आज ३ मे  जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन, हा आरसा स्वच्छ राहण्यासाठी किती महत्त्वाचा आहे, हे जाणून घेण्याचा दिवस आहे.

आजचा दिवस नेहमीसारखा उजाडतोय, पण एक वेगळी जाणीव घेऊन – जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन ! वर्तमानपत्राचं काम फक्त बातम्या पोहोचवणं नव्हे, तर लोकशाहीची नाडी जपणं आहे. हे काम करायला एक सजग, निर्भीड आणि स्वतंत्र पत्रकारिता लागते.

चहा हातात घेऊन तुम्ही आजही एखादं दैनिक उघडाल. कुठे राजकारणावर टीका, कुठे एखादी आशावादी गोष्ट, तर कुठे समाजाचं वास्तव – हे सगळं तुम्हाला त्याच काही पानांमध्ये भेटतं. हे शक्य होतं कारण शब्दांना अजूनही थोडीशी मोकळीक आहे. आणि ही मोकळीक जपणं, हाच आजचा खरा अर्थ.

स्वातंत्र्य म्हणजे फक्त सरकार विरुद्ध लिहिणं नाही, तर सत्य बोलण्याची हिंमत असणं. कधी समाजाच्या गैरसमजांना आरसा दाखवणं, कधी अंधश्रद्धेवर प्रश्न विचारणं, तर कधी एखाद्या दुर्लक्षित गावातल्या शाळेची कहाणी देशापर्यंत पोचवणं हे सगळं शब्दांचं सामर्थ्य आहे.

आपण वाचक आहोत. हे सामर्थ्य आपण ही टिकवायचं आहे. विश्वास ठेवून, प्रश्न विचारून आणि सत्याला साथ देऊन.

आजचा दिवस फक्त पत्रकारांचा सण नाही ; तो आपल्या सर्वांचा आहे. कारण स्वातंत्र्याचा खरा अर्थ, तो वाचणाऱ्याशिवाय पूर्ण होत नाही.

का साजरा होतो जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन !

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ३ मे हा दिवस जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन किंवा फक्त जागतिक प्रेस दिन म्हणून घोषित केला , जो प्रेस स्वातंत्र्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि १९४८ च्या मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणेच्या कलम १९ अंतर्गत समाविष्ट असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा आदर आणि समर्थन करण्याच्या त्यांच्या कर्तव्याची सरकारांना आठवण करून देण्यासाठी आणि १९९१ मध्ये विंडहोक येथे आफ्रिकन वृत्तपत्र पत्रकारांनी एकत्रित केलेल्या विंडहोक घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो .

————————————————————————————–

पत्रकारितेची वाट आणि वाटा –

पत्रकार म्हणजे काय ? एखाद्या शासकीय कागदाला टेबलावरून उचलणारा, लोकल ट्रेनमध्ये फोनवर बातम्या पाठवणारा, गावाच्या चौकातल्या पाण्याच्या टाकीबद्दलही मंत्रालयात प्रश्न विचारणारा  तो सगळ्यांचाच प्रतिनिधी. पण, हे सगळं शक्य होतं स्वातंत्र्यामुळे. सरकार, भांडवलशाही, सोशल ट्रोल्स यांच्या दडपणाखालीही जे पत्रकार निर्भीड राहतात, तेच आपल्याला वास्तव सांगतात.

“लोकशाहीचा चौथा स्तंभ” – पण तो अजूनही टिकून आहे का ?

आज सोशल मीडियावर एक वाक्य फिरतंय –“Breaking News पेक्षा Breaking Silence अधिक महत्त्वाचं आहे.” खरंच – बऱ्याचदा लोकांनी न बोललेलं सांगणं, हीच खरी पत्रकारिता. आज कुणी माइक समोर धरतो, कुणी कॅमेरामागे उभा राहतो, तर कुणी ट्विटर-थ्रेडमधून सांगतो. पण त्यांच्या शब्दांना मोकळेपणा नसेल, तर त्यांचं बोलणं केवळ आवाज ठरेल – अर्थ नाही.

सोशल मीडियाचा काळ – प्रत्येकजण ‘पत्रकार’

आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे, ट्विटर-इंस्टा-यूट्यूब आहे. घटना घडताच काही सेकंदांत जगापर्यंत पोहोचता येतं. पण हीच शक्ती गैरवापरासाठी वापरली, तर अफवा, ट्रोलिंग, बायस्ड रिपोर्टिंग यांचं थैमान माजतं. म्हणूनच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा अर्थ – फक्त मोकळं लिहिणं नाही, तर जबाबदारीने लिहिणंही आहे.

शब्द मोकळे राहो, लोकशाही शाबूत राहो –

पत्रकार, वाचक, आणि सोशल मीडिया यांचं नातं आता अतूट झालंय. आज आपण जर “Fact Check” न करताच पुढे फॉरवर्ड करत असू, तर ते स्वातंत्र्यावरचं संकट आहे. म्हणूनच – आजच्या दिवशी एवढंच म्हणावंसं वाटतं –

“एका लेखाने क्रांती घडते,
आणि एका खोट्या बातमीने समाज पेटतो –
शब्द मोकळे हवेत, पण सत्याशी बांधलेले !”

जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

वाचूया, विचार करूया, आणि प्रश्नही विचारूया – कारण हेच खरं लोकशाहीचं बळ आहे.

————————————————————————————————

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments