दृष्टीक्षेपात महाराष्ट्र : वास्तव आणि वाटचाल

0
528
Google search engine

कोल्हापूर : प्रसारमाध्यम डेस्क

              बहु असोत सुंदर संपन्न की महा

              प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन. संपूर्ण देशाला पुरोगामी विचार देणारा आपला महाराष्ट्र…सह्याद्री कड्याकपारींनी बनलेल्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा देदीप्यमान असा इतिहास लाभलेला आहे. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रसारमाध्यम न्यूज पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक, आदी क्षेत्रांचा घेतलेला संक्षिप्त आढावा…

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्याला ऋग्वेदात राष्ट्र संबोधलं गेलं आहे. महाराष्ट्रातील स्थळांचा उल्लेख रामायण.. महाभारतात आहे. मौर्यानंतर इथे सातवाहन.. चालुक्य.. वाकाटक देवगीरीचे यादव इ. ची सत्ता होती. शालिवाहनाचे शके आजही महाराष्ट्रीय पंचांगात आहे. मराठी ही शालिवाहन काळापासूनची राजभाषा मानली जाते. या ऐतिहासिक काळानंतर महाराष्ट्राला एक पुरोगामी आणि वैज्ञानिक विचार देणारी संत परंपरा लाभली. हेच संत परंपरेचे विचार छत्रपती शिवरायांचे प्रेरणास्थान होते. याच विचारांच्या आधारे त्यांनी स्वराज्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेचा आधार घेऊन पुढे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराने आधुनिक महाराष्ट्राची पायभरणी झाली. याच समाज सुधारकांनी मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या धार्मिक, जातीय, भाषिक आणि प्रांतीय अस्मितांचे विचार संपवून सामाजिक ऐक्य आणण्याच्या दृष्टीतून विशेष प्रयत्न केले. उत्तर कर्नाटकातील मराठी भाषिकांना महाराष्ट्रात सामावून घेण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा पाया १९३८ मध्ये वऱ्हाडात रचला गेला. हा प्रदेश मध्य प्रांतात (सी.पी.अँड बेरार) असल्याने लोकांचे हाल होत होते. १९४६ ला ग. त्र्यं. माडखोलकर यांच्या अध्यक्षतेखालील मराठी साहित्य संमेलनात ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ स्थापन होत संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही याचे अभ्यासपूर्ण समर्थन केले होते. या चळवळीला यश येऊन सन १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. १ मे १९६०  ह्याच दिवशी आपले महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. तेव्हापासून आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो.

महाराष्ट्र म्हणजे नररत्नाची खाण –

समतेचा आदर्श ठेवून “दुरीतांचे तिमिर जावो” म्हणत विश्वकल्याणाची प्रार्थना केली ती संत ज्ञानेश्वरांनी. अध्यात्मा बरोबर आधुनिक विचारांचा वारसा संत तुकाराम.. नामदेव.. एकनाथ.. रामदास स्वामी अशा येथील अनेक संतांनी दिला.

भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र देत देशव्यापी नेतृत्व केले ते लोकमान्य टिळकांनी. महात्मा गांधीचे गुरु गोपाळकृष्ण गोखले इथलेच. महात्मा गांधीना सर्वाधिक कार्यकर्ते दिले ते महाराष्ट्राने. भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे.. स्त्री शिक्षणासाठी झटणारे सुधारक आगरकर.. महात्मा फुले. सावित्रीबाई फुले.. समतेची राज्यव्यवस्था निर्माण करणारे शाहू महाराज असो वा स्वातंत्र्यात आपले राज्य सहभागी करणारे औंधचे राजे इथलेच. देशाला घटना देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची ही भूमी.

कुटुंबानेही नाकारलेल्यांना मायेची सावली देणारे बाबा आमटे आणि परिवार.. सिंधुताई सपकाळ या महाराष्ट्राच्याच. देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील दिल्या या महाराष्ट्राने. एखादा राज्याचा विक्रम ठरावा असे ९ भारतरत्न हे महाराष्ट्राचे. अर्थ.. संरक्षण.. रेल्वे.. दळणवळण अशी महत्त्वाची खाती महाराष्ट्रातील नेत्यानी  सांभाळून दिशा दिली आहे. महाराष्ट्रातील सैनिकांची मोठी फौज देशाच्या संरक्षणासाठी कार्यरत असते.

देशात पहिल्यांदाच महिलांना सरकारी नोकरी व राजकारणात ३३ टक्के आरक्षण मिळवून देणारे राज्य म्हणजे महाराष्ट्र.  याचबरोबर राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक सर्वागीण विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. शंतनुराव किर्लोस्करानी  कारखानदारीचा पाया रचला. चित्रपट क्षेत्राची मुहुर्तमेढ रचली ती दादासाहेब फाळकेनी. लावणी असो वा नाट्यसंगीत ही महाराष्ट्राची देणगी.

सध्याचा महाराष्ट्र –

महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक GDP असलेले राज्य आहे. देशाच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे 20 टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून येथील शेअर बाजार, बँकिंग संस्था आणि कॉर्पोरेट हेडक्वार्टर्समुळे राज्याची अर्थव्यवस्था बळकट आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांतून उद्योगधंद्यांचे जाळे विस्तारले आहे. माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल, फार्मा, फिल्म उद्योग आदींनी राज्याच्या अर्थकारणात मोठा वाटा उभारला आहे.

समाजकारण –

महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात सामाजिक भिन्नता जाणवते. शहरीकरण, शिक्षणप्रसार, आरोग्यसेवा, महिलांचा सहभाग, आणि सामाजिक सुधारणांचे आंदोलने ही राज्याची वैशिष्ट्ये आहेत. पुणे, मुंबई, नागपूर यांसारख्या शहरी भागांमध्ये प्रगती झाली असली तरी मराठवाडा, विदर्भातील काही भाग अद्यापही सामाजिकदृष्ट्या मागे आहेत. जातीव्यवस्था, आरक्षण, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी यांसारखे प्रश्न अद्याप राज्याला भेडसावत आहेत.

महाराष्ट्रात ग्रामीण-शहरी, उच्चवर्ग-श्रमिक वर्ग, साक्षर-अशिक्षित, दलित-ओबीसी अशा सामाजिक गटांत विविधता आहे.
महाराष्ट्र समाजदृष्ट्या प्रगल्भ राज्य आहे. जाती, भाषा, धर्म, प्रांत अशा विविध अंगांनी इथला समाज विभागलेला असला तरी सामाजिक सुधारणा आणि समतेची चळवळ कायम आहे.

सामाजिक बदल आणि आंदोलनं –

महाराष्ट्र हा समाजसुधारणेचा केंद्रबिंदू राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित आणि वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी अनेक चळवळी झाल्या. स्वातंत्र्यापूर्व काळातील सत्यशोधक चळवळ, महिलांचे हक्क, शिक्षण आणि स्वावलंबन यासाठीचे प्रयत्न, आणि आधुनिक काळातील आरक्षणासाठीचे आंदोलनं – यामुळे महाराष्ट्र समाजिक दृष्टिकोनातून सजग राज्य ठरले. मराठा आणि ओबीसी आरक्षण विषयावरील चळवळी, शेतकरी आंदोलनं ही सामाजिक व आर्थिक विसंगती दाखवून देतात. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रामध्ये जात,धर्म व भाषा यावरून सामाजिक वातावरण गढूळ झाल्याचे दिसून येते. यासाठी अस्मितेचे राजकारण कारणीभूत ठरत आहे.

सहकार चळवळ –

सहकार क्षेत्रात महाराष्ट्राने देशात आदर्श निर्माण केला आहे. शरद पवार, यशवंतराव चव्हाण यांसारख्या नेत्यांनी सहकार आंदोलनाला चालना दिली. साखर कारखाने, दूध संघ, पतसंस्था आणि नागरी सहकारी बँका यामुळे ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली. मात्र, अलीकडच्या काळात सहकारी संस्थांमध्ये गैरव्यवहार, राजकारणी हस्तक्षेप यामुळे विश्वासार्हतेला तडा गेला आहे.

सहकार चळवळीने महाराष्ट्रात कृषी व ग्रामीण विकासाला चालना दिली. यात मोठ्या प्रमाणात कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत साखर उद्योगाची प्रमुख केंद्रे ठरली आहेत. तर ग्रामीण भागाची आर्थिक नाडी म्हणून ओळखला जाणारा   दुग्ध व्यवसाय वाढीस लागल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत झाला आहे.

राजकारण-

महाराष्ट्राच्या राजकारणात सामाजिक सुधारणांचा खोल ठसा आहे. राजकारण सामाजिक सुधारणा आणि नेतृत्वाने समृद्ध आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा विविध विचारसरणींच्या नेत्यांनी राज्याला आकार दिला. सध्या बहुपक्षीय आणि आघाडीधारित राजकारण प्रबळ असून, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), शिवसेना (ठाकरे व शिंदे गट) यांचे महत्त्व कायम आहे. सत्तासंघर्ष, विकासाभिमुख धोरणे आणि सामाजिक मतप्रवाह यांमुळे महाराष्ट्राचे राजकारण गतिशील राहिले आहे.

महाराष्ट्रात प्रारंभी काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र 1978 मध्ये पहिल्यांदा आघाडी सरकार सत्तेवर आले. 1995 मध्ये शिवसेना-भाजपने सत्ता हस्तगत केली आणि काँग्रेसला पहिल्यांदाच सत्तेबाहेर बसावे लागले. 2014 मध्ये भाजपने स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता मिळवली. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्ता मिळवली. पुढे 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत नव्या सरकारची स्थापना झाली. या सर्व घडामोडी राज्याच्या राजकारणात विविध प्रवाहांचा आणि बदलत्या जनमताचा प्रभाव दर्शवतात. सध्या महाराष्ट्रातील राजकारण विकासाभिमुख न राहता जाती धर्माच्या राजकारणात अडकून पडल्याचे दिसत आहे.

आरोग्य आणि सामाजिक कल्याण –

राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’, ‘बालसंवर्धन योजना’, आणि ‘माझी आरोग्य योजना’ यांद्वारे गोरगरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. कोविड काळात महाराष्ट्राने मोठ्या शहरांत आरोग्य व्यवस्थापनात अनुभव घेतला. मुंबईतील टाटा हॉस्पिटल, पुण्यातील ससून, नागपूरमधील AIIMS यांनी आरोग्य सेवा सुदृढ करण्यास हातभार लावला.

सिंचन –

महाराष्ट्रात १९९९ पासून २०१४ पर्यंत हजारो कोटींच्या सिंचन प्रकल्पांवर खर्च झाला, तरी सिंचनाचा लाभ मर्यादितच राहिला. त्यानंतर शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना यामध्ये पावसाचे पाणी अडवणे, मृद व जलसंधारण. तसेच मायक्रो इरिगेशन (ठिबक, तुषार) यातून पाण्याचा कार्यक्षम वापर या सोबत शेततळे योजना अंतर्गत स्थानिक जलसाठे निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने पाणी साठा वाढण्यास मदत झाली.

राज्यात पश्चिम महाराष्ट्रात चांगली सिंचन व्यवस्था असली तरी विदर्भ आणि मराठवाडा भाग पावसावर अवलंबून आहे. जायकवाडी, कोयना, उजनी, भातसा ही प्रमुख धरणे असून, जलयुक्त शिवार योजनेने काही भागात सुधारणा झाली आहे. मात्र अपूर्ण प्रकल्प, पाण्याचे राजकारण, आणि नियोजनाचा अभाव यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी पाण्याच्या टंचाईशी लढत आहेत. मायक्रो इरिगेशन आणि जलसंधारणाच्या उपायांची गरज आहे.

महाराष्ट्रात सिंचनाची स्थिती विभागनिहाय विषम आहे. पश्चिम महाराष्ट्रात कृष्णा, भीमा नद्यांच्या खोऱ्यात सिंचनाची चांगली व्यवस्था असली तरी विदर्भ व मराठवाड्यात पर्जन्यावर आधारित शेतीचे प्रमाण जास्त आहे. पाण्याचा अपव्यय, अपूर्ण धरणे आणि योजनांची अंमलबजावणी यामुळे अनेक भाग पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. ‘जलयुक्त शिवार’ सारख्या योजनांमुळे परिस्थितीत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे.

रोजगार –

महाराष्ट्र रोजगाराच्या संधींच्या दृष्टीने अग्रगण्य राज्य आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद यांसारख्या औद्योगिक शहरांमध्ये विपुल रोजगारसंधी आहेत. तथापि, ग्रामीण भागात अजूनही बेरोजगारीचा प्रश्न आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजना (MNREGA) सारख्या योजनांमुळे काही प्रमाणात काम मिळते, पण ती पुरेशी नाहीत. तरुणांसाठी कौशल्यविकास, स्टार्टअप्स आणि डिजिटल उद्योग हे रोजगाराचे नवे पर्याय निर्माण करत आहेत.

महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य असूनही ग्रामीण भागात बेरोजगारी मोठा प्रश्न आहे. शासनाकडून महात्मा गांधी रोजगार हमी योजना यात ग्रामीण भागात मजुरी आधारित रोजगार, कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून तरुणांना प्रशिक्षण देऊन नोकरीसाठी तयार करणे तसेच शासकीय भरती व मेळावे आयोजित करून नोकरीच्या संधी निर्माण केल्या जात आहेत.

व्यवसायासाठी नवे पर्याय उपलब्ध होत असून स्टार्टअप कल्चर अंतर्गत पुणे, मुंबई, नागपूर येथे तरुण उद्योजक पुढे येत आहेत, तर  झोमॅटो, स्विगी, ओला, उबरसारख्या सेवांमुळे कंत्राटी रोजगार वाढले आहेत.

उद्योग आणि व्यापार –

महाराष्ट्र हे देशाचे औद्योगिक केंद्र मानले जाते. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून येथे अनेक मोठ्या कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर ही महत्वाची औद्योगिक शहरे आहेत. ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग हे मुख्य उद्योग आहेत. ‘मेक इन महाराष्ट्र’ व ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यात आले आहे. महाराष्ट्र भारताच्या एकूण औद्योगिक उत्पादनात २०% हून अधिक वाटा उचलतो.

1962 मध्ये MIDC ची स्थापना करून औद्योगिकीकरणाला चालना देण्यात आली. पुण्यातील हिंजवडी, औरंगाबादचा वाळूज, नाशिकचा अंबड, नागपूरचा मिहान आणि मुंबईतील अनेक MIDC प्रकल्प औद्योगिक विकासाचे केंद्र ठरले. पुणे आणि मुंबई ही माहिती तंत्रज्ञानाची केंद्रे बनली असून TCS, Infosys, Wipro, Capgemini सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची येथे उपस्थिती आहे. नागपूरमध्ये AI आणि डेटा सायन्सशी संबंधित स्टार्टअप्सना चालना मिळत आहे.

शैक्षणिक –

महाराष्ट्राने गेल्या काही दशकांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली असून राज्याचा साक्षरता दर देशाच्या सरासरीपेक्षा अधिक आहे. २०११ च्या जनगणनेनुसार राज्याचा साक्षरता दर ८२.३४ टक्क्यांवर पोहोचला असून यामध्ये पुरुषांचा दर ८८.३८ टक्के आणि महिलांचा ७५.८७ टक्के इतका आहे.

राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ झाल्याने गावागावात शाळा पोहोचल्या आहेत. ‘सर्व शिक्षा अभियान’, ‘मिड डे मील योजना’ अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढली आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणातही उल्लेखनीय सुधारणा दिसून येत आहेत.

तांत्रिक व उच्च शिक्षणातही राज्याने भरीव वाढ केली आहे. सध्या राज्यात २५ पेक्षा अधिक विद्यापीठं असून पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद ही शैक्षणिक केंद्रं म्हणून उदयाला आली आहेत. IIT मुंबई, IIM नागपूर, AIIMS नागपूर आणि NIT नागपूर यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्था राज्यात कार्यरत आहेत.

डिजिटल शिक्षणाच्या दिशेने पावलं टाकताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ‘ई-लर्निंग’, ‘डिजिटल क्लासरूम’ अशा योजना राबवल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, शिक्षकांची रिक्त पदं आणि गुणवत्तेतील तफावत यांसारखी आव्हानं अद्याप कायम आहेत.

तरीही, राज्याच्या शैक्षणिक क्षेत्राची दिशा सकारात्मक असून भविष्यात गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता यावर भर देणे आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठे आहेत.नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अंमलबजावणीबाबत राज्य पुढाकार घेत आहे.

राज्यातील क्रीडा क्षेत्रात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाल्या असून युवा खेळाडूंना स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवण्याच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागात क्रीडा संस्कृती रूजताना दिसत आहे.

क्रीडा –

‘खेलो इंडिया’ अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. शिवाय, राज्य सरकारद्वारे दिला जाणारा ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’ हा खेळाडूंना प्रोत्साहन देणारा महत्त्वाचा उपक्रम ठरतो.  २०२३ मध्ये या पुरस्कारासाठी ५० पेक्षा अधिक खेळाडूंची निवड झाली होती. पुणे, मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये खासगी क्रीडा अकादम्यांचे जाळे वाढले असून क्रिकेट, कुस्ती, टेनिस, फुटबॉल आणि जलतरण यांसारख्या खेळांमध्ये प्रशिक्षणाची दर्जेदार सुविधा मिळू लागली आहे.

कोल्हापूर जिल्हा देशातील कुस्तीची राजधानी मानला जातो. येथे दरवर्षी होत असलेल्या हिंदकेसरी स्पर्धा, ‘राजर्षी शाहू कुस्ती महोत्सव’ या स्पर्धांमुळे स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं. पुणे व आसपासच्या भागांतून फुटबॉलचे अनेक युवा खेळाडू उदयाला येत आहेत. राज्यात महिला खेळाड्यांचाही सहभाग लक्षणीय वाढलेला आहे. वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती आणि बॅडमिंटनसारख्या क्षेत्रांतून राज्याच्या महिला खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकं मिळवली आहेत.गावखेड्यांत अद्यापही क्रीडांगणांची कमतरता, प्रशिक्षकांची अनुपलब्धता आणि अपुऱ्या निधीमुळे काही मर्यादा आहेत. तसेच, खेळाडूंना शैक्षणिक किंवा नोकरीच्या सुरक्षिततेबाबत अधिक प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

कला, साहित्य आणि संस्कृती – महाराष्ट्राचा आत्मा-

पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, ग्रेस, विजय तेंडुलकर, शांता शेळके यांसारख्या साहित्यिकांनी राज्याच्या सांस्कृतिक अधिष्ठानाला बळ दिले. पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे अनेक साहित्य संमेलने, महोत्सव होत असतात. लावणी, तमाशा, भारूड या पारंपरिक लोककला जपून त्यांना आधुनिक रंगमंचावर स्थान मिळाले. गणेशोत्सव, दहीहंडी, शिवजयंती, भीमजयंती, पुणे फेस्टिवल, कालिदास महोत्सव हे राज्याच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक ठरले आहेत. मराठी सिनेमा ‘श्वास’, ‘सैराट’, ‘नटरंग’ यांसारख्या कलाकृतींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे.

महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन हे विविधतेने नटलेले, पुरातनतेला आधुनिकतेशी जोडणारे आहे. येथे संतसाहित्य, लोककला, अभिजात नाट्यपरंपरा, आधुनिक साहित्य आणि चित्रकलेपासून ते चित्रपटसृष्टीपर्यंत सृजनशीलतेची समृद्ध परंपरा आहे. व.पु. काळे, विजय तेंडुलकर, शं. ना. नवरे, भालचंद्र नेमाडे यांच्या साहित्याने मराठी भाषा समृद्ध केली आहे.

कला व लोकपरंपरा :

लावणी, तमाशा, भारूड, पोवाडा या पारंपरिक कलाप्रकारांतून समाजाची दुःखद-दैन्यावस्था, वीरता आणि समाजप्रबोधन यांचं सुंदर मिश्रण आढळते., तर चित्रकला, हस्तकला, नारळशेपी वस्त्रे, वारली चित्रकला (आदिवासी लोककला), गणपती मूर्तीकला ही महाराष्ट्राची खास वैशिष्ट्ये. आहेत. नाट्यपरंपरेत  विष्णुदास भावे, किर्लोस्कर, बालगंधर्व यांच्यापासून विजय तेंडुलकर, मोहन आगाशे, सत्यदेव दुबे यांच्यापर्यंत रंगभूमीची वैभवशाली परंपरा आहे.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून सामाजिक ऐक्य वाढवले., गुढीपाडवा, दिवाळी, पोळा, नागपंचमी, शिमगा असे ग्रामीण व शहरी भागात उत्साहाने साजरे होणारे सण आहेत तर पालख्या आणि वारी परंपरेची वेगळी ओळख आहे. आषाढी वारी ही भक्तिभावाची जगातील एक अद्वितीय चालती परंपरा आहे.

महाराष्ट्र हे केवळ भौगोलिकदृष्ट्या मोठेच नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, आणि औद्योगिकदृष्ट्याही भारताचे महत्त्वाचे राज्य आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगतीची चांगली लक्षणे दिसत असली तरी अजूनही अनेक सुधारणा आवश्यक आहेत. सर्वसमावेशक, पारदर्शक आणि लोकसहभागाने चालणारे प्रशासनच महाराष्ट्राला विकासाच्या उच्चतम पातळीवर घेऊन जाऊ शकते.

येथील कला, साहित्य आणि संस्कृती ही केवळ ऐतिहासिक नव्हे, तर आजही सजीव आहे. ती राज्याच्या सामाजिक जडणघडणीत आणि जनतेच्या मानसिकतेत खोलवर रुजलेली आहे. सांस्कृतिक वारसा हे महाराष्ट्राचे खरं सामर्थ्य आहे.

या मातीत परंपरा आणि प्रगतीचा संगम आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे – सामाजिक सुधारणांपासून औद्योगिक उत्क्रांतीपर्यंत. मात्र, असमान विकास, बेरोजगारी, शेतीतील संकटे, पाणीटंचाई, व शिक्षणातील दरी यावर अजूनही काम करणे आवश्यक आहे. लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, आणि समतोल धोरणे यांच्या साहाय्याने महाराष्ट्र भविष्यातील अधिक सक्षम, समावेशक आणि सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करू शकतो.

——————————————————————————————–

Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here