पन्हाळा प्रतिनिधी: जोतिबा मंदिर परिसरात स्वच्छता मोहीमेने पाकाळणी साजरी करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत पुजारी वर्ग, ग्रामस्थ आणि भाविकांनी सहभाग घेतला होता. या स्वच्छता मोहिमेत मंदिर आणि परिसरातील स्वच्छता करण्यात आली. गावभंडाऱ्याने मंगळवारी चैत्र यात्रेची सांगता होणार आहे.
श्री.क्षेत्र जोतिबाच्या चैत्र यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. नुकत्याच पार पडलेल्या चैत्र यात्रा काळामध्ये मंदिराच्या शिखरावर आणि देवाला गुलाल, नारळ, दवणा, फुलांचे हार भाविक लोकांकडून वाहिले जातात. यंदाही सलग सुट्ट्यांमुळे जोतिबा डोंगर यात्रेकरूंनी फुलून गेला होता, त्यामूळे जोतिबा मंदीर परिसर आणि देवदेवतांच्या शिखरावर गुलाल खोबऱ्यांचा खच पडला होता. स्थानिक पुजारी , खंडकरी , कोल्हापूरातील महानगर पालिका, विविध सामाजिक संघटना ,मंडळे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे , जोतिबा देवस्थान कार्यालय अधिक्षक धैर्यशिल तिवले , जोतिबा पुजारी,ग्रामस्थ युवा वर्ग बीव्हीजी ग्रुप यांच्या वतीने जोतिबा मंदिर आणि परिसर स्वच्छ करण्यात आली.
रविवारी पालखी सोहळा झाल्यापासून गावातील युवा कार्यकर्त्यांनी गुलाल शेंडी कचरा गोळा करून स्वच्छता केली. सोमवारी सकाळपासून मंदिर परिसर, शिखर, दिपमाळ, देवांची आभूषणे, वस्त्रे, पालखी, उत्सवमूर्ती तसेच जोतिबा देवाच्या इतर साहीत्यांची स्वच्छता करण्यात आली . शिखरावर, दिपमाळावर आणि परिसरात पाण्याची फवारणी करून गुलाल धूऊन काढला.मंगळवारी दिनांक २९एप्रिल रोजी जोतिबा चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. त्यावेळी समस्त पुजारी ग्रामस्थ यांच्या वतीने गावभंडारा होणार आहे. भाविकांनी या गावभंडारा महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मानाचे दहा गावकर आणि पुजारी यांच्या वतीन करण्यात आले आहे.मंगळवारी दुपारी स्थानिक पुजारी मंडळाच्या सासनकाठीची मिरवणूक निघणार आहे. रात्री भजन,डवरी गीताचा रात्रभर कार्यक्रम होणार आहे.