मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात मृत प्राण्यांना इतरत्र टाकले जाते. परिणामी, दुर्गंधी व आजार फैलावतात. राज्य शासनाने यावर मात करण्यासाठी पहिल्यादांच पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी सशुल्क स्मशानभूमी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नगर विकास विभागाने याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांना घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. कुत्रा, मांजर, पांढरे उंदीर यासारख्या पाळीव प्राण्यांवर यामुळे अत्यंविधी करता येणार आहे.
…………………….
राज्यातील पाळीव प्राणी कुत्रा, मांजर, पांढरे उंदीर इत्यादी प्राण्याकरिता स्मशानभूमीची व्यवस्था करावी, अशी मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी २५ जुलै २०२५ रोजी राज्य विधानमंडळात औचित्याचा मुद्द्याद्वारे केली होती. स्थानिक नागरी स्वराज्य संस्थाकडून काही वेळा मनुष्य स्मशानभूमी शेजारील राखीव जागेत तर घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारच्या राखीव जागेत केले जाते. मनुष्य स्मशानभूमीच्या शेजारी जागेत प्राण्याचा अंत्यविधी केल्यामुळे धार्मिक, सामाजिक तेढ निर्माण होणे, योग्य दक्षता न घेतल्यास दुर्गंधी व आजार पसरण्याची शक्यता सरनाईक यांनी वर्तवली होती. अनेकदा राखीव जागेऐवजी मृत प्राणी इतरत्र फेकले जातात. त्यामुळे पाळीव प्राण्याच्या अंत्यविधीकरिता घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार नगर विकास विभागाने तब्बल दोन वर्षानंतर प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देणारा शासन आदेश काढला आहे.
कुत्रे, मांजर, पांढरे उंदीर, इतर गौवशीय पाळीव प्राण्यांची वयोमर्यादा कमी असते. त्यांच्या मृत्यूनंतर मृत पाण्यांना खाडी, तलाव, मोकळ्या जागा, पाण्याचे डबके किंवा रस्त्यावर फेकले जाते. संबंधित प्राण्यांच्या शरीराची योग्य विल्हेवाट न केल्यास दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्याच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करुन दयाव्या, अशा सूचना नगरविकास विभागाने दिल्या आहेत. तसेच या संदर्भात मार्गदर्शक सुचनांची आखल्या असून त्यांची अंमलबजावणी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी करावे लागणार आहेत.
…………………….
मार्गदर्शक सूचना –
राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी जागा पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी उपलब्ध करावी. संबंधित जागेला संरक्षक भिंत बांधून सुरक्षा व्यवस्था पुरवावी. मृत प्राण्यांचे अंत्यविधी करताना योग्य ती दक्षता घ्यावी. त्यातून दुर्गंधी निर्माण होणार नाही, इतर आजार पसरणार नाहीत त्यांची काळजी घ्यावी. मृत पाळीव प्राणी इतर ठिकाणी टाकले जाणार नाही यांची दक्षता घ्या. तसेच राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांनी ठरावीक शुल्क आकारुन पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी परवानगी द्यावी.
——————————————————————————