कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी ऐतिहासिक वाघनखं येत्या चार दिवसांत ( गुरुवारपर्यंत ) नागपूरहून कोल्हापुरात दाखल होणार आहेत. लंडन मधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयातून तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात आणलेल्या या अमूल्य शस्त्रसंपदेचे ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ हे भव्य प्रदर्शन कसबा बावडा येथील शाहू महाराज जन्मस्थळ, लक्ष्मी विलास पॅलेस येथे ३ मे २०२६ पर्यंत भरवले जाणार आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून परिसरातील सर्व कामांना वेग आला आहे.
६ कोटी ७६ लाखांचा निधी
या ऐतिहासिक प्रदर्शनासाठी ६ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून प्रदर्शन दालन, आकर्षक सजावट, प्रकाशयोजना आणि इतर कामे पूर्णत्वास आली आहेत. नागपूरहून वाघनखं कोल्हापुरात आणण्यासाठी विशेष वाहन आणि पोलिस बंदोबस्तासह कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. आठ महिन्यांच्या प्रदर्शनकाळातही २४ तास पोलीस बंदोबस्त असणार आहे.
पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, उपसंचालक हेमंत दळवी, सहायक अभिरक्षक अमृत पाटील, उदय सुर्वे, वि. ना. निट्टूरकर, बगीचा उपअधीक्षक उत्तम कांबळे, श्रेयस जगताप, शस्त्रतज्ज्ञ गिरीजा दुधाट आणि वास्तुविशारद अर्चना देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम राबवले जात आहे.
प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे
-
वाघनखं व इतर शस्त्रदर्शन – ‘सी’ इमारतीमध्ये छत्रपतींची वाघनखं आणि इतर शस्त्रांची पाहणी.
-
राजर्षी शाहू जन्मस्थळ दर्शन – ऐतिहासिक वास्तू आणि संग्रहालयाची सफर.
-
हत्तीचा रथ आणि घोड्यांची बग्गी – राजर्षी शाहूंच्या लोकाभिमुख कारभाराचे प्रतिकृतीदर्शन.
-
‘डी’ इमारतीतील संग्रहालय – विविध ऐतिहासिक वस्तूंची मांडणी.
-
माहितीपट व होलिग्राफी शो – राजर्षी शाहूंवरील माहितीपट आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतिहासाचा अनुभव.