कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
देशात वस्तू व सेवा करामध्ये २२ सप्टेंबरपासून सुधारणा केल्या. यानुसार जीएस्तीचे नवीन दर लागू केले. या नवीन दरामुळे अन्नपदार्थांपासून दैनंदिन गरजेच्या वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी काही प्रमाणात स्वस्त झाल्या आहेत. विशेष म्हणजे, १४७ प्रकारच्या वस्तूंवर हा करच लागू नाही. या वस्तू नेमक्या कोणत्या आहेत?, ते पाहू …
जीएसटी लागू नसलेल्या वस्तू :
ताजे दूध, दही, लस्सी, ताक, पनीर, नैसर्गिक मध, ताज्या भाज्या (जसे की बटाटे, टोमॅटो, कांदे, कोबी, गाजर), फळे (जसे की केळी, संत्री, द्राक्षे, सफरचंद), गहू, तांदूळ, मका, पापड, ब्रेड, मीठ, नारळाचे पाणी, आणि पशुखाद्य यासारख्या वस्तूंना जीएसटी लागू नाही. यातील बहुतांश वस्तू या युनिट कंटेनरमध्ये पॅक नसलेल्या आणि नोंदणीकृत ब्रँड नाव नसलेल्या असाव्यात. यांच्यावर जीएसटी आकारला जात नाही.
कृषी आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू :
शेतीशी संबंधित वस्तूंनाही जीएसटी लागू नाही. यामध्ये जिवंत प्राणी (जसे की गाय, मेंढी, कोंबडी), ताजे मांस, मासे, क्रस्टेशियन्स, आणि बियाण्याच्या दर्जाच्या तेलबिया (जसे की सोयाबीन, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया) यांचा समावेश आहे. याशिवाय, कापलेली फुले, जिवंत झाडे, आणि हातमाग यंत्रसामग्री यांनाही करसवलत मिळाली आहे.
सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तू :
भारतीय राष्ट्रीय ध्वज, गांधी टोपी, खादी धागा, मातीचे दिवे, काचेच्या बांगड्या, आणि पूजा साहित्य (जसे की रुद्राक्ष, पवित्र धागा, चंदन टिका) यांनाही शून्य जीएसटी लागू आहे. यामुळे सांस्कृतिक आणि पारंपरिक वस्तूंना प्रोत्साहन देण्यात आलंय. या वस्तू खरेदी करताना त्याच्या किंमती नक्की तपासून पाहा. जेणेकरुन स्वत:ची फसवणूक तुम्हाला टाळता येईल.
शैक्षणिक आणि सामाजिक वस्तू :
छापील पुस्तके, ब्रेल लिपीतील पुस्तके, वर्तमानपत्रे, मुलांचे रंगीत पुस्तके, आणि स्लेट पेन्सिल यांसारख्या शैक्षणिक वस्तूंनाही जीएसटी लागू नाही. याशिवाय, मानवी रक्त, गर्भनिरोधक, आणि श्रवणयंत्रे यांनाही करमुक्ती देण्यात आली आहे. त्यामुळे या वस्तूदेखील स्वस्त झाल्या आहेत.
फसवणुकीपासून सावध रहा
सरकारने या सवलती लागू केल्या असल्या तरी, दुकानदार ग्राहकांना चुकीची माहिती देऊन फसवू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी जीएसटी लागू नसलेल्या वस्तूंची यादी तपासून घ्यावी. सरकारच्या धोरणांनुसार या सवलती बदलू शकतात. त्यामुळे तुमच्याकडे अपडेट माहिती असणे गरजेचे आहे.