Prime Minister Narendra Modi has hinted at further tax cuts in the future.
उत्तर प्रदेश : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जीएसटी मध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केल्यानंतर केंद्र सरकारकडून करदात्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यात आणखी टॅक्स कपात होण्याचे संकेत दिले आहेत.
उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भव्य उद्घाटन करण्यात आले. यावेळी देशातील करप्रणाली, जीएसटीतील कपात आणि नागरिकांना मिळणाऱ्या थेट बचतीबाबत त्यांनी सविस्तर भाष्य केले. भविष्यात आणखी टॅक्स कपात करण्याचे स्पष्ट संकेत देत त्यांनी देशातील अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मोदी म्हणाले, “आज देश जीएसटी बचत उत्सव साजरा करत आहे आणि आपण इथेच थांबणार नाही. २०१७ मध्ये आम्ही जीएसटी लागू केला आणि आर्थिक बळकटीसाठी काम केले. २०२५ मध्ये आम्ही तो पुन्हा नवे सुधार घालून लागू करू. अर्थव्यवस्था मजबूत होत असताना टॅक्सचा भार सतत कमी होत जाईल. देशातील जनतेच्या आशीर्वादाने जीएसटी सुधारणांची ही प्रक्रिया अशीच सुरू राहील.”
२०१४ नंतरचा बदल
मोदींनी सांगितले की, २०१४ पूर्वी टॅक्सचे जाळे होते. व्यवसायाचा खर्च आणि घरगुती बजेट या दोन्हींचे संतुलन साधणे अवघड होते. “तेव्हा १००० रुपयांच्या शर्टवर तब्बल ११७ रुपये टॅक्स लागत होता. २०१७ मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर हा टॅक्स १७० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत आणण्यात आला. आता २२ सप्टेंबरनंतर त्याच शर्टवर फक्त ३५ रुपये जीएसटी भरावा लागत आहे,” असे ते म्हणाले.
“२०१४ मध्ये टूथपेस्ट, तेल, शॅम्पू यांसारख्या दैनंदिन वस्तूंवर १०० रुपयांच्या खरेदीवर ३१ रुपये टॅक्स भरावा लागत होता. २०१७ मध्ये तो १८ रुपयांवर आला आणि आता १३१ रुपयांची वस्तू फक्त १०५ रुपयांत मिळत आहे,” अशी उदाहरणे देत त्यांनी बचतीचा आकडा स्पष्ट केला.
मोदी पुढे म्हणाले, “२०१४ मध्ये एखाद्या कुटुंबाने वर्षभरात १ लाख रुपयांच्या वस्तू खरेदी केल्या असतील तर त्यांना सुमारे २५,००० रुपये टॅक्स भरावा लागत होता. नेक्स्ट जनरेशन जीएसटी लागू झाल्यानंतर आता त्यांना फक्त ५ ते ६ हजार रुपये कर भरावा लागतो. कारण बहुतेक आवश्यक वस्तूंवर आता फक्त ५ टक्के जीएसटी आकारला जात आहे.”
वाहन खरेदीतही मोठी बचत
शेतकरी व मध्यमवर्गीयांसाठी वाहन खरेदी स्वस्त झाल्याचेही मोदींनी सांगितले. “२०१४ पूर्वी ट्रॅक्टर खरेदीवर ७०,००० रुपयांपेक्षा जास्त टॅक्स भरावा लागत होता. आता त्याच ट्रॅक्टरवर फक्त ३०,००० रुपये टॅक्स भरावा लागतो, म्हणजे शेतकऱ्यांची तब्बल ४०,००० रुपयांची बचत होत आहे. पूर्वी तीनचाकी वाहनांवर ५५,००० रुपये टॅक्स असायचा, पण आता तो सुमारे ३५,००० रुपयांवर आणला आहे. स्कूटर ८,००० रुपयांनी आणि मोटारसायकली ९,००० रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत,” असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असताना कर कपातीची प्रक्रिया पुढे सुरू राहील. यामुळे ग्राहक, शेतकरी आणि उद्योग या सर्व घटकांना थेट फायदा होईल आणि देशाच्या विकासगतीत आणखी वेग येईल.