spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

Homeसहकारगोकुळ संघ : पैशांचा खेळ, चर्चेचा विषय

गोकुळ संघ : पैशांचा खेळ, चर्चेचा विषय

कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज

गोकुळ सहकारी दूध संघ आता फक्त दूध उत्पादनापुरताच मर्यादित न राहता राजकारण आणि पैशांच्या उलाढालीच्या केंद्रस्थानी आला आहे. गेले काही दिवस यावर जोरदार चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे. पुढील वर्षी एप्रिल मध्ये होणार्‍या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, गावागावातील ठराव धारकांच्या मतासाठी जोरदार स्पर्धा दिसून येत आहे.

पैशांचे प्रमाण आणि निवडणुकीवरील परिणाम

कळे (ता. पन्हाळा) येथील धर्मराज सहकारी प्राथमिक दूध संस्थेतील सभेत दोन गटांमध्ये तीव्र आर्थिक स्पर्धा दिसून आली असून एक गट एक लाख रुपये देण्यास तयार तर दुसऱ्या गटाने थेट पाच लाख रुपयांची बोली लावली.

गावातील एका ठरावासाठी तब्बल पाच लाख रुपयांची बोली लावली जात असल्याची घटना स्थानिकांसाठी धक्कादायक मानली जात असून गावागावांत याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ताधारी गटाने ठरावधारकांना ‘नजराणा’ म्हणून ५० हजार रुपये दिल्याची माहिती समोर आली आहे.

जर अशीच पद्धत साडेसहा हजार संस्थांवर लागू झाली, तर निवडणुकीसाठी किती प्रमाणात पैसा खर्च होईल, याचा विचार करताच या प्रक्रियेतील व्याप्ती आणि गती लक्षात येते. हे फक्त वित्तीय प्रश्न नसून, निवडणुकीची नैतिकता आणि पारदर्शकतेवरही गंभीर परिणाम करणारे आहे.

खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळच्या ठरावावरून झालेल्या हाणामारीच्या घटनेवर  आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ” महादेवराव महाडिक यांच्या काळात गोकुळ मध्ये असे प्रकार कधीच घडले नाहीत. मात्र, सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी काही नवे प्रयोग सुरू केल्यामुळे असे घडत आहे,” असे ते म्हणाले.

नैतिकतेवर प्रश्न आणि राजकारणाची गढूळ स्थिती

गोकुळ मधील संचालक बनल्यावर व्यवसायिक लाभ मिळतो, हे सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे ठरावधारकांचे मत राजकारणावर आधारित असते, पण पैशांच्या खेळामुळे मताची किंमत ठरवली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. “ पैसे घेतले तर चुकलं कुठं? ” अशी चर्चा दूध संस्थांच्या पातळीवर सुरू आहे.

असा प्रकारच्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या चर्चा निवडणुकीतील नैतिकतेवर प्रश्न उपस्थित करतात. यामुळे स्थानिक राजकारण अधिक गढूळ झाले असून, मोठ्या नेत्यांसाठीही ही निवडणूक आव्हानात्मक बनली आहे. आमदार सतेज पाटील, मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांसारख्या नेत्यांसाठी मतांच्या पैशाच्या आकडेवारीचे गणित सत्तेचे समीकरण बदलू शकते. याची आता झलक दिसू लागली आहे.

सामाजिक आणि आर्थिक परिणाम

गावातील शेतकरी, दूध उत्पादक आणि ठरावधारक यांच्यात हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. पैशांच्या या खेळामुळे सहकारी संस्थांच्या राजकारणावरही प्रश्न उपस्थित होतात. निवडणुकीतील अशा प्रकारच्या आर्थिक हस्तक्षेपामुळे सहकारी व्यवस्थेतील विश्वासार्हता कमी होऊ शकते.

गोकुळच्या निवडणुकीत पारदर्शकता राखणे आणि नैतिक मूल्यांचा आदर करणे हे या संस्थेच्या भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरते. अलिकडे घडत असलेल्या घडामोडींनी दाखवले आहे की, राज्यातील सहकारी संस्थांमधील निवडणुका फक्त औपचारिकता नसून, आर्थिक आणि राजकीय दबावाच्या खेळाचे मैदान बनल्या आहेत.

———————————————————————————————————————–
RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments