आयफोन १७ खरेदी साठी झुंबड

गोकुळ अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांची पोस्ट चर्चेत

0
271
As soon as the iPhone 17 arrived in India, there was a rush to buy it. Naveed Mushrif's viral post on this has created a buzz on social media
Google search engine
कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
अॅपलचा बहुप्रतिक्षित आयफोन १७ भारतात दाखल होताच खरेदीसाठी अक्षरशः झुंबड उडाल्याचे चित्र देशभर पहायला मिळाले. मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद यांसारख्या मेट्रो शहरांमध्ये पहाटे पासूनच हजारो ग्राहकांनी रांगा लावल्या. मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील अॅपल फ्लॅगशिप स्टोअर बाहेर तर गर्दीत किरकोळ हाणामारीही झाल्याची माहिती आहे. अॅपलने आयफोन १७ मालिकेची किंमत ₹ ८२,९०० ते ₹ २,२९,९०० दरम्यान ठेवली असून १९ सप्टेंबर पासून प्री-बुकिंग आणि वॉक-इन ग्राहकांसाठी विक्री सुरू झाली आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) चेअरमन नाविद मुश्रीफ यांच्या व्हायरल पोस्टने सोशल मीडियावर चर्चा रंगवली आहे. मुश्रीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये दोन लाखांचा आयफोन घेण्यापेक्षा दुभत्या गायी-म्हशींमध्ये गुंतवणूक करावी, असा अनोखा सल्ला दिला आहे.
“ खरी गुंतवणूक तीच जी उत्पन्न देते. आयफोन घेतल्यावर त्याची किंमत दोन वर्षांत ४० हजारांनी कमी होईल, पण दुभती गाय-म्हैस घेतल्यास त्याच किंमतीत तुमची गुंतवणूक दुप्पट होऊ शकते,” असा संदेश त्यांनी दिला.

मुश्रीफ यांच्या या पोस्टचे काहींनी कौतुक केले असून “ अशी जाहिरात प्रत्येक दूध संस्थेत लावा ” अशा प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्याकडे म्हशी किती आहेत, तसेच “ तुमचा मोबाईल कोणता? ” अशीही विचारणा केली. तर काहींनी हा सल्ला ग्रामीण भागातील तरुणांसाठी डोळ्यात अंजन घालणारा असल्याची नोंद केली. आयफोन महागडा असूनही सर्वसामान्यांच्या हाती दिसू लागला आहे, मात्र त्यासाठी तीन ते पाच वर्षे हप्ते फेडण्याची वेळ अनेकांवर येते. हप्ते चुकल्यास दंडही भरावा लागतो, हे वास्तव मुश्रीफ यांच्या पोस्टमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, गोकुळ संघामध्ये २५ लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प करण्यात आला असून यात म्हशीच्या दूधाचा वाटा वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या मोहिमेसाठी स्वतः पुढाकार घेत मुश्रीफ यांनी हरियाणामधून मुरा जातीच्या २० उत्कृष्ट म्हशी नुकत्याच आपल्या गोठ्यात आणल्या आहेत. आधीपासून असलेल्या म्हशी, रेडे व रेडकांसह त्यांच्या गोठ्यात आता ५४ हरियाणवी जनावरे असून हे पाऊल गोकुळ सदस्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे.

आयफोनसाठी लागलेली रांग आणि गोकुळच्या चेअरमनचा ‘दूध गुंतवणुकी’चा सल्ला – या दोन परस्परविरोधी घडामोडींमुळे सोशल मीडियावर हसरे तर कधी विचारप्रवर्तक चर्चेचे वातावरण रंगले आहे.

———————————————————————————————————————
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here