मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी ५ हजार पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती गृहराज्य व अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. प्रशिक्षणात हवालदारांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश असून, याशिवाय मुंबईत एक आधुनिक संयुक्त तपास केंद्र उभारले जात आहे.
फिर्याद दाखल होताच मिनिटभरात ती तपास केंद्रापर्यंत पोहोचेल आणि लगेच तपासाची प्रक्रिया सुरू होईल. या केंद्राचा देश-विदेशातील इतर तपास केंद्रांशी समन्वय राखला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकार भवन, कमिन्स सभागृहात आयोजित वार्तालाप कार्यक्रमात कदम यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर माहिती दिली. सायबर गुन्ह्यांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस दल सक्षम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री कदम म्हणाले की, “ सायबर गुन्हेगारी ही केवळ आर्थिक फसवणुकीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती समाजातील विविध स्तरांवर परिणाम घडवू लागली आहे. त्यामुळे पोलिस दलाला सायबर क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे.”
सरकारमधील सहकार्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, “प्रत्येकच राज्यमंत्र्याला सुरुवातीच्या काळात संघर्ष करावा लागतो. काही दिवसांनी समन्वय निर्माण होतो. काही ठिकाणी मतभेद असले तरी ते स्वाभाविक असून नेतृत्वात चांगला समन्वय आहे. त्यामुळे संघर्ष दीर्घकाळ टिकत नाही.”
प्रशिक्षणामध्ये सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, डिजिटल पुरावे गोळा करण्याच्या पद्धती, सोशल मीडियाचा गैरवापर, फिशिंग, हॅकिंग, ऑनलाइन फसवणूक अशा विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामुळे पोलिसांचे सायबर गुन्हे तपासण्याचे कौशल्य वाढेल आणि गुन्हेगारांवर वेळीच कारवाई करणे शक्य होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
—————————————————————————-