कोल्य्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात काल दिवसभर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे घरगुती गणेश मूर्ती विसर्जनात अडथळे येत होते. हा पाऊस असाच राहतोय काय अशी भिती गणेशभक्तांच्या मनात होती, कारण आजून सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन व्हायचे आहे. गणेश उत्सवाचे सिन सुरु व्हायचे आहेत. मात्र आज सकाळपासून पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे. मात्र हवामान विभागाने आजपासून ५ तारखेपर्यंत पुणे, सातारा आणि कोल्हापूरला पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ दिला आहे.
राज्याच्या काही भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. असे असताना परत पावसास सुरुवात होण्याचे चिन्हे दिसत आहेत. संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा, तर विदर्भ, मराठवाड्याला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरामध्ये सध्या चक्रवाताची स्थिती सक्रिय आहे. पुढील २४ तासांमध्ये वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा किनारपट्टीसह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने सप्टेंबरमध्ये देशात दीर्घकालीन सरासरीच्या १०९ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील २४ तासांत ०.३ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील २४ तासांत पुण्यात विजांसह पावसाची शक्यता असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे. विशेषतः घाटमाथा परिसरात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात मागील २४ तासांत ३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील २४ तासांत घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांत ५ मिमी पावसाची नोंद झाली असून, कमाल तापमान २३.७ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढील २४ तासांत तापमान २७ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता असून, घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे.
—————————————————————————————————-