कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून दरवर्षी समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी उपलब्ध होणार आहे. जागतिक बँकेच्या तांत्रिक सल्लागार असलेल्या ‘ट्रक्टेबल’ या संस्थेने सादर केलेल्या व्यवहार्यता अहवालाला हिरवा कंदील मिळाला असून त्यामुळे या प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेस गती मिळणार आहे, अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.
सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. कृष्णा खोऱ्यातून समुद्रात वाहून जाणारे ५० टीएमसी पाणी ९३ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून गुरुत्वाकर्षण पद्धतीने उजनी धरणात वळविण्याचा प्रस्ताव आहे. २०१९ मध्ये कोल्हापूर आणि सांगली भागात आलेल्या भीषण पुरानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचाच भाग म्हणून हा प्रकल्प राबविण्यात येत असून, पुराचे पाणी वाया न जाता दुष्काळग्रस्त भागाच्या सिंचनासाठी उपयोगात आणण्याचा उद्देश आहे.
कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या २३.६६ टीएमसी पाण्यापैकी सध्या सात टीएमसी पाणी उपलब्ध करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उर्वरित १६.६६ टीएमसीसह एकूण ५० टीएमसी पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याकडे वळवले जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, तसेच शेतजमिनी, पिके आणि जनतेचे होणारे नुकसानही टाळता येणार आहे.
या प्रकल्पामुळे पूरनियंत्रणाबरोबरच दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळणार असून, शेती क्षेत्राला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास आमदार क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
———————————————————————————————-