मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मोठ्या संख्येने मराठा बांधव ठाण मांडून बसले आहेत. “ जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माघार नाही,” अशी ठाम भूमिका समाजानं घेतली आहे.
सुरुवातीला हायकोर्टाने या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. मात्र त्यानंतर काही अटी-शर्तीसह एक दिवसासाठी परवानगी मिळाली. त्यानंतर पुन्हा एक दिवसाची मुदतवाढ मिळाल्याने आझाद मैदानावर आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. आझाद मैदानावर घोषणाबाजी, भाषणे आणि आरक्षणासाठीची ठाम भूमिका यामुळे वातावरण तापलं आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक आज राधाकृष्ण विखे पाटील यांच्या रॉयल स्टोन बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी उपसमितीचे सदस्य दादा भुसे, माणिकराव कोकाटे, गिरीश महाजन यांच्यासह इतर सदस्य दाखल झाले आहेत. प्रशासकीय यंत्रणेतील काही महत्त्वाचे अधिकारीदेखील बैठकीसाठी पोहोचले आहेत.
याशिवाय आमदार सुरेश धस आणि आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील विखे पाटील यांची भेट घेतली आहे. या बैठकीनंतर उपसमितीचे सदस्य मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बैठकीत नेमके कोणते निर्णय घेतले जातात, यावर आंदोलनाची आणि पुढील राजकीय घडामोडींची दिशा ठरणार आहे.
——————————————————————————————————————————