कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापुरात आयटी पार्क व्हावं, अशी मागणी गेली तब्बल १२ वर्षांपासून होत आहे. कारण कोल्हापूर आणि जिल्ह्यातील अनेक तरुण आयटी क्षेत्रात कार्यरत असले तरी त्यांना रोजगारासाठी मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबाद सारख्या महानगरांकडे जावं लागतं. या तरुणांना आपल्या शहरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आयटी पार्क उभारण्याची गरज वारंवार व्यक्त केली जात आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूरला आयटी पार्क यशस्वी होण्यासाठी पायाभूत सुविधा हे एक मोठं आव्हान आहे. पायाभूत सुविधांसह हाय–स्पीड इंटरनेटसोबत सुरक्षित नेटवर्क ही आयटी पार्कची ‘लाईफलाईन’ आहे. आयटी कंपन्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्लायंट्ससोबत रिअल–टाईममध्ये काम करतात. यासाठी फाईव्ह जी, फायबर ऑप्टिक्स किंवा सॅटेलाईट इंटरनेटसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची निर्मिती कोल्हापुरात करावी लागेल. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, डेटा अॅनालिसिस, क्लाऊड कम्प्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता हे सर्व इंटरनेटवर अवलंबून असतात. बेंगळुरूमधील आयटी हब यशस्वी होण्यामागे तिथली उत्कृष्ट इंटरनेट सुविधा मैलाचा दगड ठरली. तिथे अनेक टेलिकॉम कंपन्या आणि डेटा सेंटर्स आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अखंडित सेवा मिळते.
यासाठी प्रशासनाने शेंडा पार्क येथील कृषी खात्याची ३० एकर जागा उपलब्ध करून दिली असून कृषी, उद्योग आणि महसूल विभागांमध्ये त्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या जागेचा विस्तार मर्यादित असल्याने भविष्यात मोठ्या कंपन्यांसाठी ती अपुरी पडणार आहे. त्यामुळे बाहेरून कोल्हापुरात येऊ पाहणाऱ्या कंपन्यांना कुठे जागा द्यायची, हा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे.
दरम्यान, उद्योग विभागाने आता कोल्हापूर–रत्नागिरी महामार्गालगत नव्या जागेचा शोध सुरू केला आहे. सध्या कोल्हापूरात ३५० हून अधिक आयटी कंपन्या कार्यरत असून दरवर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त सॉफ्टवेअरची निर्यात येथेून केली जाते. पुणे आणि बंगळुरू या आयटी हबच्या मधोमध असल्याने कोल्हापुराचे महत्त्व अनेक कंपन्यांना जाणवू लागले आहे.
प्रतितयश कंपन्यांचे ब्रँड मूल्यामुळे इतर छोट्या कंपन्या आणि गुंतवणूकदार त्या शहरात आकर्षित होतात. या कंपन्या उच्च दर्जाच्या सुविधांच्या मागणीमुळे परिसराचा विकासही वेगाने होतो. या कंपन्या स्थानिक अर्थव्यवस्थेला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडतात. सुरुवातीच्या काळात हैदराबादमध्येही फक्त मध्यम आकाराच्या कंपन्या होत्या. नंतर मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या आल्या. तसे कोल्हापुरातही शक्य आहे.
-
स्थानिक गरजांवर आधारित आयटी सेवा : कोल्हापूर हे शेती, सहकार आणि लघु उद्योगांचे केंद्र आहे. या क्षेत्रांसाठी सॉफ्टवेअर सोल्युशन्स (उदा. अॅग्री–टेक, सप्लाय चेन मॅनेजमेंट) विकसित करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिल्यास स्थानिक मागणी पूर्ण होईल आणि पार्कला आधार मिळेल.
-
छोट्या कंपन्यांना आकर्षित करणे : मोठ्या कंपन्यांपेक्षा छोट्या आयटी फर्म्सना कमी खर्चात आणि मर्यादित सुविधांमध्येही काम करता येते. कोल्हापुरात जमीन आणि ऑपरेशनल खर्च कमी असल्याने या कंपन्यांसाठी हे आकर्षक ठरू शकते. सरकारी प्रोत्साहन (कर सवलती, सबसिडी) दिल्यास अशा कंपन्या येऊ शकतात.
-
कुशल मनुष्यबळाचा वापर : कोल्हापूरमध्ये अभियांत्रिकी आणि आयटी शिक्षण घेणारे अनेक तरुण आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार दिल्यास बाहेरून मोठ्या कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल. प्रशिक्षण केंद्रे आणि इनक्युबेशन सेंटर्स उभारून स्टार्टअप्सना प्रोत्साहन देता येईल.
-
आऊटसोर्सिंग हब म्हणून विकास : पुणे, मुंबई, बेंगळुरूसारख्या शहरांतील मोठ्या आयटी कंपन्या त्यांचे काही प्रोजेक्ट्स येथील खर्च कमी असल्याने याठिकाणी आऊटसोर्स करू शकतात.



