मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख अधिक घट्ट होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोषनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे.
नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दीड कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार असून, तालुका ते राज्यस्तरावर होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धांसाठी तब्बल १० कोटी रुपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या स्पर्धांमध्ये पारंपरिक तसेच आधुनिक उपक्रमांना स्थान देण्यात आले आहे.
शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा केली आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन करण्यात येणार असून पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार असून गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित झाली आहे. परदेशातही गणरायाचे आगमन धुमधडाक्यात व्हावे, म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, ही भूमिका घेण्यात आली आहे.
सहभागाची नोंदणी
सहभागासाठी पु. ल. देशपांडे अकादमीच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. मात्र, केवळ नोंदणीकृत संस्था किंवा परवानाधारक गणेश मंडळांनाच अर्ज करण्याची परवानगी असेल. सहभागी मंडळांना गतवर्षीच्या ते यंदाच्या अनंत चतुर्दशीपर्यंतचा कार्यक्रम व उपक्रमांचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने संगीत, नृत्य, भजन, कीर्तन, आरती स्पर्धा, दशावतार, पोवाडा, लावणी, खडिगम्मत, झाडीपट्टी, वहिगायन, चित्रकला, मूर्तिकला, शास्त्रीय व लोकसंगीत, वाद्यवृंद सादरीकरण, समाजप्रबोधनपर एकांकिका, लोकनाट्य, वगनाट्य, हास्य-नाट्य आणि विनोदी प्रयोग अशा विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन होणार आहे.
महोत्सवाचा व्यापक परिणाम
गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे सांस्कृतिक वारशाची जपणूक, पर्यावरणपूरक उपक्रमांचा प्रसार, कला-साहित्याचा विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग यांचा संगम साधला जाणार आहे.
या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacaderny.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जात आहेत. ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे
या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांची प्रतिष्ठा वाढणार असून, ग्रामीण ते शहरी स्तरावर गणेशोत्सव साजरा करण्याचा उत्साह नवी उंची गाठेल असे सार्वजनिक उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यांनी सांगितले.
—————————————————————————————–