मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य शासनाने नागरिकांना शासकीय सेवा अधिक सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व १००१ सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. त्यामुळे नागरिकांना आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि माहिती थेट त्यांच्या स्मार्टफोनवर मिळणार आहे.
बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय पुढीलप्रमाणे –
-
सेवा व्हॉट्सॲपवर : ‘आपले सरकार’ पोर्टलवरील १००१ सेवा आता थेट व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात येतील.
-
तालुकास्तरीय ‘रिंग’ प्रणाली : प्रत्येक तालुक्यात १० ते १२ गावांचा समावेश असलेली ‘रिंग’ तयार करण्याचे ठरले असून, त्यासाठी स्वतंत्र गट आणि टीम नियुक्त केली जाणार आहे.
-
सेवांचे सुलभीकरण : मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या ९ सेवांचे एकत्रीकरण करण्याचे निर्देश दिले.
-
कागदपत्रे कमी करणे : अर्ज करताना नागरिकांना कमी कागदपत्रांची आवश्यकता भासावी यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
-
गुणवत्ता तपासणी : सेवांची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्रयस्थ संस्थेद्वारे नियमित तपासणी केली जाईल.
-
एकरूप डॅशबोर्ड : सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसारखे असावेत, जेणेकरून नागरिकांना एकसमान अनुभव मिळेल.
-
अपील व मल्टी-मॉडेल प्रणाली : सेवा वितरणात अपीलची सुविधा उपलब्ध होईल, तसेच प्रमाणपत्र वितरणासाठी ईमेल, पोर्टल आणि व्हॉट्सॲपचा एकत्रित वापर केला जाणार आहे.