मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन नियम, १९८९ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव जारी केला आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम ९६ (२) (xxxii) नुसार शासनाला दिलेल्या अधिकारांचा वापर करून हे नियम तयार करण्यात आले असून, २९ ऑगस्ट नंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
सुधारणा मसुद्यानुसार, जड मालवाहतूक वाहनांमध्ये (Heavy Goods Vehicle) चालकासोबत सहाय्यक (क्लिनर/attendant) ठेवण्याची बंधनकारक अट शिथिल करण्यात येणार आहे. मात्र, ही सवलत केवळ अशा वाहनांसाठी लागू असेल, जी ड्रायव्हर असिस्ट सिस्टीम (Driver Assist System) ने सुसज्ज असतील.
या प्रणालीमध्ये ३६० अंश दृश्य कॅमेरा, सर्व ब्लाइंड स्पॉट व मागील भागाचे थेट दृश्य (live feed), तसेच ध्वनी व दृश्य स्वरूपातील इशारे देणारी प्रॉक्सिमिटी अलार्म प्रणाली असणे आवश्यक आहे. विशेषतः वाहन रिव्हर्स गिअरमध्ये असताना ही प्रणाली मागून येणाऱ्या वाहनचालकांना आणि इतर रस्त्यावरील वापरकर्त्यांना पूर्वसूचना देईल, तसेच चालकाला सुरक्षिततेसाठी आवश्यक इशारे मिळतील.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील अनेक वाहनधारक संघटनांनी या संदर्भात शासनाकडे मागणी केली होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे अशा वाहनांमध्ये क्लिनरची गरज उरलेली नाही, असे वाहनधारकांचे म्हणणे असून त्यामुळे अनावश्यक खर्च कमी होणार आहे.
या मसुद्यावर कोणालाही हरकती किंवा सूचना असल्यास त्या परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्त कार्यालय, ५ वा मजला, फाउंटन टेलिकॉम बिल्डिंग, क्र. २, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथे पाठवाव्यात. नियोजित तारखेपूर्वी प्राप्त होणाऱ्या हरकती शासनाच्या विचारार्थ घेतल्या जाणार आहेत.
————————————————————————————————