कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र, या प्रवेशाआधीच महायुतीमध्ये तणावाचे ढग निर्माण झाले आहेत. परंतु आता चंद्रदीप नरके, राहुल पाटील आणि महायुतीतील नेते यांनी ते वाद थोपवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
आमदार चंद्रदीप नरके – महायुती मधील कोणत्याही पक्षात कुणाचाही प्रवेश होत असेल तर मी त्याचे स्वागतच करतो. मात्र, प्रवेश करताना संघर्षाची भाषा करणं योग्य नाही. अजून निवडणुकीला वेळ आहे, त्यामुळे राहुल पाटील यांनी असली वक्तव्ये टाळावीत. प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. राहुल पाटील यांच्यामुळे महायुतीलाच बळ मिळणार आहे. त्यांची अडचण आम्हाला नाही. मात्र, त्यांनी संयमाने वागावं, अशी अपेक्षा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना योग्य समज देतील.”
नरके पुढे म्हणाले की, “ महायुती म्हणून सर्व निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. जिथं शक्य आहे तिथं एकत्र, अन्यथा स्वतंत्र लढायचा विचार होईल. स्थानिक परिस्थितीचा अहवाल वरिष्ठ नेत्यांना दिला जाणार आहे. राहुल पाटील यांची वक्तव्ये महायुतीला बाधा आणणारी ठरू नयेत. विरोधी आघाडीला पोषक वातावरण करून देण्यापेक्षा त्यांनी महायुतीसाठी काम करावे.”
दरम्यान, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समेटाचा सूर लावताना म्हटलं की, “ भविष्यात पाटील आणि नरके हे एकमेकांचे मित्र म्हणूनही दिसतील. मतदारसंघ फेररचनेत कोल्हापूर जिल्ह्यात साधारण तीन मतदारसंघ वाढतील. त्यामुळे भविष्यात नरके आणि पाटील हे एकमेकांचा प्रचार करतानाही दिसतील.”
नरके यांनी पुढे स्पष्ट केले की, “ माझ्या मतदारसंघातील सभासद असलेल्या कारखान्याचे अस्तित्व टिकले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. राहुल पाटील आता महायुतीत आले आहेत, त्यामुळे त्यांना निंदक कसं म्हणणार ? माझ्या गुड बुक मध्ये येण्यासाठी त्यांनी महायुतीत चांगलं काम करावं. निंदक न होता महायुतीसाठी काहीतरी करावं, ही अपेक्षा आहे.”
गोकुळच्या निवडणुकीवर बोलताना नरके म्हणाले की, “ त्या वेळची परिस्थिती वेगळी होती. आता मात्र महायुती म्हणून गोकुळ निवडणुकीला सामोरे जाणार असून त्यात महाडिक यांचाही सहभाग असेल.”
राहुल पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे निर्माण झालेला वाद हळूहळू शांत होईल की नाही हे येणार काळ ठरवेल. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत स्थानिक स्तरावर नवी समीकरणे घडणार यात शंका नाही.
———————————————————————————————