मराठी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर अभिनयाचा दरारा निर्माण करणारे, चित्रकला व शिल्पकलेत अष्टपैलू प्रतिभा गाजवणारे आणि घराघरांत मायेने स्मरले जाणारे नाव म्हणजे चित्रतपस्वी सूर्यकांत मांडरे. त्यांचे व्यक्तिमत्त्व जितके बहुआयामी तितकेच हृदयस्पर्शी होते. आज त्यांच्या २६ व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कार्याला दिलेला हा उजाळा…
१९२५ साली कोल्हापूर येथे जन्मलेल्या सूर्यकांत मांडरे यांना घरातूनच नाट्यकलेचे संस्कार मिळाले. सरस्वती विद्यालय आणि हरिहर विद्यालयातील शिक्षणासोबत व्यायामाची आवड जोपासल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व दांडगे व आकर्षक घडले. त्यांचे थोरले बंधू दादा मांडरे हे आधीच चित्रपटसृष्टीत नावाजलेले होते. लहानपणीच दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या नजरेत आलेल्या सूर्यकांत यांनी अवघ्या बाराव्या वर्षी “ध्रुव” चित्रपटातून कृष्णधवल पडद्यावर पहिले पाऊल ठेवले. “बहिर्जी नाईक” चित्रपटात साकारलेल्या बालशिवाजीच्या भूमिकेनंतर त्यांना “सूर्यकांत” हे नाव लाभले आणि पुढे तेच नाव घराघरात पोहोचले.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी शंभराहून अधिक चित्रपट केले. ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक तसेच स्त्रीजीवनावर आधारित अशा विविध अंगांनी त्यांनी नायकाची भूमिका प्रभावीपणे साकारली. गृहदेवता, बाळा जोजो रे, स्त्री जन्मा तुझी कहाणी, स्वराज्याचा शिलेदार, मल्हारी मार्तंड, महाराणी येसूबाई, रंगपंचमी, शुभमंगल हे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात आजही कोरलेले आहेत. वारणेचा वाघ मधील त्यांची भूमिका तर अजरामर ठरली आहे.
जयश्री गडकर यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. तब्बल २७ चित्रपटांत या जोडीने रसिकांच्या हृदयात घर केले. याशिवाय सुलोचना, उषा किरण यांच्या सोबतच्या त्यांच्या जोडीदार भूमिकाही तेवढ्याच गाजल्या. पडद्यावर जितके सहज भासले तितक्याच ताकदीने ते नाट्यरंगभूमीवरही झळकले. लग्नाची बेडी, झुंझारराव, बेबंदशाही, तुझे आहे तुजपाशी, आग्र्याहून सुटका अशी त्यांची नाटके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिली.
कलाकार म्हणून त्यांचा दरारा मोठा होता, परंतु त्यांची अष्टपैलुत्वाची छापही तेवढीच ठळक होती. ते एक उत्तम चित्रकार, शिल्पकार आणि लेखक होते. प्रसिद्ध चित्रकार बाबा गजबर यांच्याकडे त्यांनी चित्रकला शिकले होते. पुण्यातील त्यांच्या कलादालनात चित्रे, शिल्पकृती आणि पुरस्कारांनी सजलेला ठेवा नंतर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. त्यांच्या आत्मचरित्राला “धकाटीपाती” ला राज्य पुरस्कार मिळाला, तर १९७८ मध्ये त्यांनी “ईर्षा” या चित्रपटाचे निर्मिती-दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केले.
अभिनय, चित्रकला, लेखन यापलीकडे त्यांची ओळख एक प्रेमळ पितामह म्हणून होती. पाठीवर नातवंडांना घेऊन खेळवणारे, छोट्या रुसव्याला मुलांसारखे रुसून हसवणारे, घरातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी करणारे हे त्यांचे रूप कुटुंबियांच्या हृदयात आजही जिवंत आहे. शिस्त, वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा हे त्यांचे जीवनमंत्र अमूल्य असे आहेत.