नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
सोमवारी दुपारी देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्या Airtel, Jio आणि Vodafone-Idea यांच्या सेवा अचानक ठप्प झाल्या. यामुळे देशभरातील लाखो वापरकर्त्यांना कॉल करता आले नाहीत आणि इंटरनेट सेवा बंद पडली. दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चंदीगड, अहमदाबाद, गुवाहाटी, मदुरईसह अनेक शहरांत मोठ्या प्रमाणावर नेटवर्क समस्येच्या तक्रारी नोंदवल्या गेल्या.
Airtel वर सर्वाधिक परिणाम
Airtel वापरकर्त्यांना दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर अडचणी जाणवायला लागल्या. Downdetector या outage ट्रॅकरनुसार सुमारे ३,६०० तक्रारी नोंदवल्या गेल्या. यामध्ये –
-
५१ % वापरकर्ते कॉल करू शकत नव्हते.
-
३१ % वापरकर्त्यांना इंटरनेट वापरता येत नव्हते.
-
१८ % वापरकर्त्यांच्या मोबाइलवर सिग्नलच नव्हता.
Airtel ने अधिकृत निवेदन देत तांत्रिक अडचणी मान्य केल्या असून, सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Jio ची इंटरनेट सेवा ठप्प
सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास Jio च्या नेटवर्कमध्ये बिघाड झाला. Downdetector वर २०० हून अधिक तक्रारी नोंदल्या गेल्या. त्यापैकी
-
५४ % वापरकर्त्यांना इंटरनेट मिळत नव्हते
-
३३ % वापरकर्ते JioFiber वापरू शकत नव्हते
-
१३ % वापरकर्ते कॉल करू शकत नव्हते
Jio कडून मात्र अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
Vodafone-Idea चा तुलनेने कमी प्रभाव
Vodafone-Idea च्या नेटवर्कमध्ये तुलनेने कमी बिघाड झाला. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, चेन्नई आणि जयपूरसह काही शहरांत समस्या दिसून आली, मात्र केवळ ५० च्या आसपास तक्रारी नोंदवल्या गेल्या.
कॉल्स आणि इंटरनेट सेवा अचानक ठप्प झाल्यामुळे वापरकर्त्यांनी सोशल मिडियावर संताप व्यक्त केला आहे. X (पूर्वीचे ट्विटर), Facebook आणि अन्य प्लॅटफॉर्मवर अनेकांनी आपले अनुभव शेअर करत दूरसंचार कंपन्यांवर नाराजी व्यक्त केली.
———————————————————————————————–