मुंबई : प्रसारमाध्यम न्यूज
यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात भारताने ‘ ऑपरेशन सिंदूर ’ द्वारे जगासमोर दाखवलेली लष्करी ताकद, देशभक्तीचा संदेश आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराची जनजागृती व्हावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाशी समन्वय साधून हा उत्सव शांतता, धार्मिक सौहार्द आणि उत्साहाच्या वातावरणात साजरा करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रशासनाला गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, डॉ. पंकज भोयर, योगेश कदम, मुख्य सचिव राजेश कुमार, तसेच विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गणेशोत्सवाला राज्य शासनाने राज्य महोत्सवाचा दर्जा दिला असून, मागील वर्षी दिलेल्या सर्व सवलती याही वर्षी कायम राहतील. ईद ए मिलाद सणही याच कालावधीत येत असल्याने समन्वय साधून कायदा-सुव्यवस्था आणि धार्मिक सौहार्द राखावे. ध्वनिक्षेपक परवानगीचे दिवस न्यायालयाच्या अधीन राहून वाढविण्यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील.
मूर्तीकारांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत त्यांनी सांगितले की, परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे आणि महापालिकेच्या संगणकीय ‘एक खिडकी’ योजनेचा लाभ घ्यावा. गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविणे, तसेच उंच मूर्तींसाठी खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्या वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
याशिवाय, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यालयांचा व्यावसायिक वापर होत नसल्याचे लेखी दिल्यास अशा कार्यालयांवर मालमत्ता कर आकारला जाणार नाही, असा निर्णयही घेण्यात आला.
बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, बृहन्मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष गणेश दहिबावकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, गणेशोत्सव समित्या आणि मूर्तिकार संघटनांचे अध्यक्ष उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनीही सहभाग घेतला.
————————————————————————————