मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्यातील पालकमंत्री पदावरून निर्माण झालेला वाद अजूनही शांत झालेला नसतानाच, १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनासाठी कोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार याची यादी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केली आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला १८ जानेवारी रोजी राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १९ जानेवारीला नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची नियुक्ती काही तासांतच रद्द करण्यात आली होती. त्यावेळी रायगडला अदिती तटकरे आणि नाशिकला गिरीश महाजन यांची नियुक्ती झाली होती, पण महायुतीतील तणावामुळे या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली होती. तेव्हापासून हा वाद कधी राज्याच्या तर कधी दिल्ली दरबाराच्या पातळीवर पोहोचत आहे.
ताज्या यादी प्रमाणे, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. रायगडसाठी शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्यात पालकमंत्रीपदावरून संघर्ष सुरू आहे. शिवसेना आमदारांनी गोगावले यांनाच ही जबाबदारी द्यावी अशी मागणी केली आहे, तर राष्ट्रवादी अदिती तटकरे यांच्या बाजूने आहे.
भरत गोगावले यांनी गेल्याच आठवड्यात, ” तिढा सुटला तर ठीक, नाहीतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल ” असे वक्तव्य केले होते. त्यामुळे, शिंदे यांच्या अलीकडच्या दिल्ली दौऱ्यानंतर कोणता तरी तोडगा निघाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यंदा बीडमध्ये ध्वजारोहण करणार असून पुण्यात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. पालकमंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर पवार यांचा हा पहिलाच स्वातंत्र्यदिन सोहळा असणार आहे. गेल्या आठवड्यातच बीड दौऱ्यात त्यांनी विकासाची हमी देत गुन्हेगारांना इशाराही दिला होता.
———————————————————————————