नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप आणि निवडणूक आयोगावर थेट आणि धक्कादायक आरोप केले. “ मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यांमुळे देशातील लोकशाही धोक्यात आली आहे,” असा इशारा देत, त्यांनी एकाच व्यक्तीने तीन राज्यांत कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा थेट पुरावासहीत गंभीर आरोप केला.
राहुल गांधींनी आदित्य श्रीवास्तव या व्यक्तीचे नाव घेत दावा केला की, याच व्यक्तीने तीन वेगवेगळ्या राज्यांत मतदान केले आहे. “ही एक घटना नाही, तर ही एक सिस्टिमॅटिक चोरी आहे,” असे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. “आम्ही पुरावे दिले, आयोगाने डोळेझाक केली,” असा टोला त्यांनी लगावला.
निवडणूक आयोगाने आम्हाला डेटा दिलाच नाही
राहुल गांधींचा आरोप होता की, विरोधकांना खास करून काँग्रेसला आयोगाने मतदान संदर्भातील डिजिटल डेटा देण्यास नकार दिला. “ मतदार यादी ही देशाची संपत्ती आहे, तीच आम्हाला मिळाली नाही,” असे सांगत त्यांनी भाजपला मिळणाऱ्या “ विश्लेषण अयोग्य ” डेटावरही सवाल उपस्थित केला.
भाजप आणि आयोगावर थेट निशाणा
राहुल गांधी म्हणाले, “ २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतं चोरली आहेत. निकाल जाहीर झाल्यापासूनच आम्हाला वाटत होतं की ‘दाल में कुछ काला है’. विरोधकांवर जनतेचा रोष असताना तो भाजपवर का जाणवत नाही ? ”
‘लोकसभेला विजय, विधानसभेत पराभव ?’
राहुल गांधींनी महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेवर विशेष लक्ष केंद्रित करत सांगितले की, “ लोकसभेत महाविकास आघाडीला भरभरून मतं मिळतात आणि पाच महिन्यांतच विधानसभेत पराभव ? ही आकडेवारी आणि तफावतच संशयास पात्र आहे. इतकी लोकं एवढ्या लवकर कशी काय मतदार बनतात ? ”
एक कोटी नव्या मतदारांचा सवाल
राहुल गांधींनी दावा केला की, केवळ पाच महिन्यांत महाराष्ट्रात एक कोटी नव्या मतदारांची भर पडली. “ पाच वर्षांत जेवढे मतदार वाढले नाहीत, ते पाच महिन्यांत कसे वाढले? एवढे वाढले की लोकसंख्येपेक्षा जास्तच वाटू लागले,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सीसीटीव्ही फुटेज गायब?
राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेजच नष्ट केल्याची माहिती समोर आली आहे. “आम्ही विचारतो का ? मतदान दिनाच्या पारदर्शकतेसाठी हे आवश्यक होतं. पण हेच फुटेज नष्ट केलं गेलं, ही तर मतांची चोरी असल्याचा स्पष्ट पुरावा आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
राहुल गांधींचे पाच आरोप-
पहिला आरोप – राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी देशातील निवडणुकांत घोटाळा होत असल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात पाच महिन्यांत पाच वर्षांपेक्षा जास्त मतदार वाढले, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय.
दुसरा आरोप – तसेच, महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय झाला. पण विधानसभेच्या निवडणुकीत मात्र इंडिया आघाडी पराभूत कशी काय झाली? महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान तब्बल एक कोटी मतदार वाढले, असा दुसरा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला.
तिसरा आरोप – याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो. पण आमच्या या आरोपांवर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दिसरा आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने आम्हाला डिजिटल डेटा का दिला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
चौथा आरोप – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान संध्याकाळी ५.३० वाजल्यानंतर मतदान वाढलं. भाजपा आणि निवडणूक आयोगाने मिळून मतं चोरली आहेत. चार पोलिंग बुथवर एकाच व्यक्तीने मतदान केल्याचे समोर आले. एकाच व्यक्तीचे कर्नाटक, महाराष्ट्र आणि यूपीमध्ये मतदान आहे, असाही आरोप राहुल गांधींनी केला.
पाचवा आरोप – अनेक मतदारांचे मतदार यातीत फोटोच नाहीत. किंवा मग ते फोटो एवढे छोटे आहेत, जे ओळखायला येतच नाहीत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. नव्या मतदारांसाठी फॉर्म 6 चा वापर केला जातो, असा पाचवा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
निवडणूक आयोग, भाजपा काय उत्तर देणार ?
दरम्यान, आता राहुल गांधी यांनी मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचे सांगताना थेट पुरावे सादर केल्यानंतर आता निवडणूक आयोग यावर कोणती भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच भाजपादेखील यावर कोणती प्रतिक्रिया देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
या आरोपांमुळे देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी एकत्र येण्याचे संकेत दिले असून, संसदेत आणि न्यायालयात या प्रकरणाची मोठी झळ उठण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी सादर केलेले आरोप, पुरावे आणि आकडेवारी अत्यंत गंभीर असून, निवडणूक आयोगाने त्यावर स्पष्ट आणि पारदर्शक स्पष्टीकरण द्यावे, अशी देशवासीयांची अपेक्षा आहे. एकाच व्यक्तीचे अनेक ठिकाणी मतदान, मतदार वाढीतील संशयास्पद झपाटा आणि सीसीटीव्ही फुटेज नष्ट होणं या सर्व बाबी भारताच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
——————————————————————————————————