मराठी कलेचे माहेरघर असलेल्या कोल्हापूरच्या मातीतील सर्जनशीलतेचा ठसा पुन्हा एकदा राज्य पातळीवर झळकला आहे. कोल्हापूरच्या रांगड्या ग्रामीण वास्तवावर आधारित ‘गाभ’ या चित्रपटाने ६० व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दोन महत्त्वाचे पुरस्कार पटकावत मोठी घवघवीत कामगिरी केली आहे.
‘गाभ’ ला ‘ कै. दादा कोंडके ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ पुरस्कार मिळाला, तर लेखक-दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांना ‘कै. अनंत माने ग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक’ या सन्मानाने गौरवण्यात आले.
हा सोहळा मंगळवारी रात्री मुंबईतील वरळी येथे दिमाखात पार पडला. यावेळी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते अनुप जत्राटकर यांना आणि प्रख्यात दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते चित्रपटाचे निर्माते मंगेश गोटुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रसाद ओक आणि अमृता सुभाष यांनी समर्थपणे पार पाडली.
या पुरस्कार सोहळ्यात एक विशेष आणि अनोखा कोल्हापुरी योगायोग अनुभवायला मिळाला. सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट दिग्दर्शक पुरस्कार कै. अनंत माने यांच्या नावे असून ते कोल्हापूरचे, हे पुरस्कार वितरण करणारे आशुतोष गोवारीकर हे ही कोल्हापूरचे, आणि ‘गाभ’चे निर्माते मंगेश गोटुरे हे देखील कोल्हापूरचे ! असा त्रिवेणी संगमच यावेळी मंचावर एकत्र दिसून आला.
‘गाभ’ला अंतिम फेरीतील दहा उत्कृष्ट चित्रपटांमध्ये स्थान मिळाले होते. याच प्रमाणे उत्कृष्ट दिग्दर्शक गटात अनुप जत्राटकर आणि प्रथम पदार्पणातील उत्कृष्ट अभिनेत्री गटात सायली बांदकर यांना नामांकन मिळाले होते.
निपाणीतील उदयोन्मुख दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी या यशाच्या माध्यमातून निपाणीचे नावही मराठी चित्रपटसृष्टीत भक्कमपणे अधोरेखित केले आहे. ग्रामीण प्रश्नांची परखड मांडणी, वास्तवाचा नेमके भान आणि कोल्हापूरी भाषाशैलीचा सुबक वापर या सर्वांच्या एकत्रित परिणामातून ‘गाभ’ हा चित्रपट सर्वार्थाने गहिरा ठरला आहे. या यशामुळे अनुप जत्राटकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, कोल्हापूर आणि निपाणीच्या कलेला अभिमान वाटावा, असे हे यश ठरले आहे.