कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
जमीन मोजणीची प्रक्रिया अधिक अचूक, जलद व सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी एकूण १७३२ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून अत्याधुनिक रोव्हर्स खरेदी केले जाणार असून महसूल विभागासाठी नवीन कार्यालयीन इमारती व शासकीय निवासस्थानांची उभारणीही केली जाणार आहे.
या निर्णयामुळे मोजणीची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत अधिक अचूक आणि वेलेत बचत करणारी ठरणार आहे. नव्या रोव्हर्सच्या साहाय्याने जमिनीच्या सीमारेषा अधिक स्पष्टपणे अधोरेखित करता येणार असून त्यामुळे जमीन व मालमत्तेसंबंधी वादांचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
राज्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम, आधुनिक आणि जनतेसाठी उपयुक्त ठरावं, यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील कार्यालयीन सुविधा सुधारण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीमुळे महसूल विभागाच्या कामकाजात गतिमानता येणार आहे.
राज्यात ‘ई-मोजणी २.०’ प्रणालीमुळे जमीन मोजणी नकाशाची ‘क’ प्रत डिजिटल स्वरूपात नागरिकांना उपलब्ध होत आहे. या कामाला आणखी वेग मिळणार आहे. कारण अत्याधुनिक रोव्हरचा या कामात उपयोग होणार आहे. कृती आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्य शासनाकडून बाराशे रोव्हर्स खरेदी केले जाणार आहेत. या यंत्रामुळे जमीन मोजणीच्या कामाला मोठी गती मिळणार आहे.
—————————————————————————————–