कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर जिल्ह्यात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. सार्वजनिक गणेश मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर मिरवणुकांचे आयोजन केले जाते. मात्र, या मिरवणुकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लेझर लाईटमुळे भाविकांच्या डोळ्यांना होणाऱ्या धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मागील वर्षी गणेश मूर्ती आगमन मिरवणुकी दरम्यान अनेक भाविकांच्या डोळ्यांवर थेट लेझर लाईट पडल्याने त्यांच्या डोळ्याच्या पडद्याला तसेच बुबळाला गंभीर इजा झाल्याची नोंद आहे. याच पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत मिरवणुकांमध्ये लेझर लाईटच्या वापरावर बंदी घातली आहे.
गणेश मूर्ती आगमन, विसर्जन मिरवणूक तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान लेझर लाईट थेट डोळ्यावर पडल्यास डोळ्याच्या बुबुळाला आणि पडद्याला कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता असते. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, हा आदेश संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती वा मंडळांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सुरक्षित आणि सुसंस्कृत सण साजरा करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
——————————————————————————————