कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या उद्घाटनाची तारीख बदलण्यात आली असून, हे उद्घाटन आता १६ ऑगस्टच्या ऐवजी १७ ऑगस्ट रोजी होणार आहे.
याआधी १६ ऑगस्ट रोजी सर्किट बेंचचे उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती जिल्हा बार असोसिएशन प्रसिद्ध केली होती. मात्र याच दिवशी सरन्यायाधीश भूषण गवई मंडणगड येथील एका समारंभास उपस्थित राहणार आहेत. म्हणूनच कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या उद्घाटनाची तारीख बदलली आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळवण्यास अधिक सोयीचे ठरणारे हे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती. या उद्घाटन कार्यक्रमासाठी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि महाराष्ट्रातील वरिष्ठ न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्घाटनाचा कार्यक्रम सर्वसामान्यांना अनुभवता यावा यासाठी दसरा चौकात करण्याची चर्चा सुरु आहे. यासाठी जिल्हा बार असोसिएशनने खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्याशी पत्रव्यवहार सुरू ठेवला आहे.
उच्च न्यायालयाकडून नोटीस जाहीर : कोल्हापुरात सर्किट बेंचबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नोटीस जाहीर केली आहे. सर्किट बेंचमध्ये कोल्हापूर, सांगली,सातारा, सिंधदुर्ग, रत्नागिरी व सोलापूर या सहा जिल्ह्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्किट बेंच नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गोव्यानंतर कोल्हापूर येथे होत असल्याचे स्पष्ट केले आहे.
—————————————————————————————————