मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राज्यात वातावरण तापलं आहे. २९ ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या लाँग मार्चच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला थेट आणि तीव्र शब्दांत इशारा दिला आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत स्पष्ट सांगितलं की, ” या आंदोलनात जर चूक झाली, तर त्याची किंमत मोदींनाही मोजावी लागेल.”
धाराशिव येथील दौऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “एकदा आमची डोकी फुटलेली आहेत, आता आमच्या आई-बहीणींना जर धक्का लागला तर क्षमा नाही. आम्ही आता मूक राहणार नाही. ही लढाई आरक्षणासाठी नाही, तर स्वाभिमानासाठी आहे.”
आमच्याच विटांनी फोडली आमचीच डोकी
जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी प्रकरणाची आठवण करून दिली. त्यांनी भावना व्यक्त करत सांगितले की, “त्या घटनेचा विचार झाला की काळीज चर्र करून जातं. आमच्याच घराच्या विटांनी आमच्याच लोकांची डोकी फोडली गेली. जेव्हा गोळ्या संपल्या, तेव्हा उलट्या बंदुका करून आम्हाला मारलं गेलं. आता जर आम्हाला अडवलं, तर महाराष्ट्रातल्या पानंद रस्त्यावर सुद्धा आवाज उठेल. ही तुमची सवय आहे जनतेची माया नाही, आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही.”
आता चुकीला माफी नाही
जरांगे पाटलांनी सरकारला सणसणीत इशारा देताना सांगितलं की, “आई-बहीण आणि पोरांवर जर हात पडला, तर मराठा कुठल्याही थराला जातील. मराठे पुन्हा पुन्हा मार खायला मोकळे नाहीत. आता चुकीला माफी नाही. मराठा समाज सरकारचा मार निमूटपणे सहन करणार नाही.”
२९ ऑगस्टचा मोर्चा ठरणार निर्णायक?
मुंबईत होणाऱ्या या लाँग मार्चसाठी नियोजन अंतिम टप्प्यात आहे. धाराशिवमधून सुरू झालेला हा आवाज आता संपूर्ण राज्यभर पसरत आहे. जरांगे पाटील सध्या राज्यभर दौरे करत असून, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर समाजबांधवांशी चर्चा सुरू आहे.
राज्य सरकारसाठी हा मोर्चा आणि त्याआधीचा रोष निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे आगामी काही दिवस हे केवळ मराठा आरक्षणाच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
——————————————————————————————–