spot_img
सोमवार, सप्टेंबर 22, 2025

9049065657

Homeक्रीडादिव्या देशमुखचा शासनातर्फे गौरव

दिव्या देशमुखचा शासनातर्फे गौरव

नागपुरात मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार सोहळा

नागपूर : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
अवघ्या १९ व्या वर्षी जगज्जेता बुद्धीबळपटू म्हणून नावारूपाला आलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखचा भव्य नागरी सत्कार महाराष्ट्र सरकारतर्फे नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात दिव्याच्या कामगिरीचं विशेष कौतुक करत म्हणाले, “ दिव्याच्या विजयामुळे मला तिहेरी अभिमान वाटतो. एक भारतीय, एक महाराष्ट्रीयन आणि एक नागपूरकर म्हणून. दिव्याकडून आजच्या पिढीला मोठी प्रेरणा मिळाली आहे. तिचा नागरी सत्कार करणे ही आमची जबाबदारी आहे.”
मंत्रिमंडळ बैठकीतील एक मजेशीर किस्सा शेअर करत सांगितले, “ दिव्याच्या अभिनंदनाचा ठराव घेताना छगन भुजबळ म्हणाले,  ‘ नागपूरचे लोक बुद्धिबळात फार हुशार आहेत, ते जरा जास्तच बुद्धिमान दिसतात.’ यावर मी मिश्कीलपणे उत्तर दिलं, ‘ राजकारणातही आम्ही बुद्धीबळ खेळतो आणि चेकमेट करतो ! 
राज्य सरकारच्यावतीने नागपूरकन्या आणि महाराष्ट्रकन्या म्हणून दिव्याचा सत्कार करत तिला ३ कोटी रुपयांचे पारितोषिकही देण्यात आले. यावेळी, दिव्यामुळे महाराष्ट्राची, देशाची मान जगभरात उंचावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
या सत्कार सोहळ्यात क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचंही पहिलं अधिकृत भाषण झाले. ते म्हणाले, “आजचा दिवस दिव्याच्या कष्टाचा गौरव करणारा आहे. ती केवळ भारताची नव्हे, तर महाराष्ट्राची मृदुलता आहे. दिव्याने मुली सक्षम असतात हे जगाला दाखवून दिलं आहे. तिचे आई-वडील व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक आभार.”
कोकाटे यांनी सांगितले की, “मुलींना खेळासाठी विशेष योजना आणणार, आणि दिव्यासारखे खेळाडू घडावेत यासाठी मी प्रयत्नाची पराकाष्ठा करीन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात क्रीडा विभाग अग्रेसर राहील.”
दिव्या देशमुखने आपल्या भाषणात हा सत्कार “ जीवनातील एक खास आणि दुर्मिळ क्षण ” असल्याचे सांगितले. “ मी मनापासून आभार मानते की, माझा असा सत्कार करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री महोदयांनी एक बुद्धीबळ स्पर्धा आयोजित केली होती, त्यात मला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळाली, त्यामुळेच मी या टप्प्यापर्यंत पोहोचू शकले,” असं दिव्याने नमूद केलं.
ती पुढे म्हणाली, “ नागपूर माझं घर आहे. जगात कुठेही गेले तरी नागपूरची आठवण होते. यापुढे वर्ल्ड चॅम्पियनशिप हे माझं पुढचं लक्ष्य आहे. मी पहिली नागपूरकर मुलगी ठरावी जिला हा सन्मान मिळेल, याची आशा आहे.” दिव्या देशमुखच्या यशामुळे महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ नकाशावर अधोरेखित झालं आहे. तिचा हा प्रवास राज्यातील अनेक नवोदित खेळाडूंना नवी दिशा दाखवणारा ठरेल, यात शंका नाही.

————————————————————————————-

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments