कुरुंदवाड : अनिल जासूद
शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी येथील गणेशोत्सव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. यावर्षी गणेशवाडीचा गणेशोत्सव डाॅल्बीला फाटा देऊन पारंपारिक वाद्याने व्हावा, असा निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आग्रही मागणी असून ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी गणेशवाडीच्या ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आहे.
गणेशवाडीमध्ये गतवर्षी गणेशविसर्जनावेळी डाॅल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने अनेक वृद्ध,तरुणांच्या कानाच्या पडद्याना इजा झाली होती. तसेच आतिषबाजी करताना झालेल्या स्फोटात चार अल्पवयीन मुलांचे चेहरे भाजुन गंभीर इजा झाली होती. या गंभीर गोष्टींची दाखल घेऊन गणेशवाडी येथील सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होताना दिसत आहे.
गणेशवाडीतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव संस्थेला १०० वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात लोकमान्य टिळकांनी या गावाला प्रत्यक्ष भेट दिली होती. असा ऐतिहासिक वारसा या गावाला लाभलाआहे. गणेशवाडी येथे पुरातन असे हेमाडपंथी गणेश मंदिर आहे. हे मंदिर गणेशवाडीसह पंचक्रोशीतील गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे.येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकमधील हजारो भाविक येतात. या गावातील मंडळे उत्सव काळात रक्तदान शिबीर,आरोग्य शिबिर,मान्यवरांची व्याख्याने,ज्वलंत विषयावर सजीव देखावा ,दररोज महाप्रसाद असे सामाजिक उपक्रम राबवतात.
गतवर्षी गणेशवाडीतील पंचवीस सार्वजनिक मंडळानी एकाचदिवशी “श्री”ची जल्लोषी विसर्जन मिरवणुक काढली होती. यावेळी काही मंडळानी डाॅल्बी लावले होते.या डॉल्बीच्या कर्णकर्कश आवाजाने बऱ्याच वृद्ध,प्रौढ,तरुणांच्या कानाच्या पडद्यांना इजा झाली होती यातील अजुनही काहीना बहिरेपणाचा त्रास जाणवत आहे. भविष्यात गणेशवाडीतील ग्रामस्थांना आशा घटनांना सामोरे जाऊ लागू नये म्हणून यावर्षीपासून गणेशोत्सव पारंपारीक वाद्यात पार पडावा, अशी चर्चा ग्रामस्थ करत आहेत.
हा उत्सव एखाद्या मंडळापुरता न राहता तो एकत्रित रुपाने नियोजनबद्ध रितीने करावा. सर्व कार्यक्रमाचे आयोजन एकाच व्यासपीठावर करावे. दररोज एका मंडळाचा एक कार्यक्रम असे नियोजन केल्यास भव्य स्वरुपात उत्सव साजरा होईल. ग्रामस्थांची भावना आहे. डाॅल्बीवर,फटाक्यावर अनावश्यक लाखो रुपयांचा वायफळ खर्च करण्यापेक्षा याच रकमेतून गावासाठी भरीव सामाजिक कार्याची उभारणी होऊ शकते. यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या गणेशवाडी गावाचा आदर्श महाराष्ट्रासमोर उभा राहू शकतो. या अनुषंगाने गणेशवाडी ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत.
—————————————————————————————————-