कुरुंदवाड : प्रतिनिधी
धरण पाणलोटक्षेत्रात पावसाने दिलेली उघडीप, विविध धरणातून कमी केलेला विसर्ग यामुळे शिरोळ तालुक्यातील कृष्णा- पंचगंगा नदीचा पूर बुधवारपासून संथगतीने ओसरु लागला आहे. परिणामी नदीकाठावरील नागरीकासह शेतकर्यांनी पुरापासून सुटकेचा सुस्कारा टाकला आहे.
गेल्या चार दिवसापासून शिरोळ तालुक्यातील कृष्णा-पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर वाहत आहे. दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत सतत वाढ होत राहिल्याने पाणी नदीकाठावरील गवतकुरणातून ऊस पिक शेती क्षेत्राकडे सरकत होते. यामुळे नदीकाठावर क्षेत्र असलेल्या शेतकर्यामध्ये धाकधुक वाढली होती. मात्र गेले दोन दिवस पावसाच्या उघडीपीसह, विविध धरणातून विसर्ग कमी करण्यात आल्यामुळे सध्या पूर ओसरु लागला आहे. यामुळे संबधित शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी सकाळपासून शिरोळ तालुक्यातील कृष्णेच्या पातळीत घट होत आहे.
बुधवारी सकाळी आठ वाजता नृसिंहवाडी जवळ कृष्णेची पाणी पातळी ४९ फुट ६ इंच होती. ती सांयकाळी चार वाजता ४९ फुट झाली आहे. राजापूर बंधार्याजवळ सकाळी पाणी पातळी ३९ फुट ३ इंच होती, ती सांयकाळी पाच वाजता ३८ फुट ९ इंचावर खाली आली आहे. यावरुन कृष्णेचा पूर संथगतीने ओसरण्यास सुरुवात झाल्याचे दिसते.
बुधवारी सकाळी जिल्ह्यातील विविध नद्यावरील ४३ बंधारे पाण्याखाली होती. यातील दोन बंधार्यावरील पाणी ओसरल्याने सांयकाळी पाचवाजेपर्यंत ४१ बंधारे पाण्याखाली राहीली आहेत. शिरोळ तालुक्यातही बुधवारी दिवसभर पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे.
दरम्यान पूर ओसरत असला तरी कोयतून २१८२४ क्युसेक, वारणेतून १३१९८ क्युसेक,राधानगरीतून २९२८ क्युसेक विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे. बुधवारी सांयकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ८६.०४ टीएमसी, वारणा धरणात २८.९३ टीएमसी, राधानगरी धरणात ८.३२ टीएमसी तर अलमट्टी धरणात ९७.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
———————————————————————————-