कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरु होतोय. याचबरोबर एकामागून एक सण-उत्सव येत आहेत. टेबलाईदेवीची यात्रा झाली, बेंदूर झाला. नागपंचमी झाली.आता गणेशोत्सव येणार. प्रत्येक सण, उत्सव आणि यात्रेत नारळाला अनन्यसाधारण महत्व असते. या सणात पूजनासाठी आणि जेवणातही नारळाचा अर्थात खोबऱ्याचा समावेश असतोच. मात्र नारळ आणि पर्यायाने वाळलेल्या खोबऱ्याचे दर वाढले आहेत. याचा फटका विशेषत: भाविकांना बसत आहे.
काही दिवसातच गणेशोत्सव येईल. या उत्सवात तर नारळाला खूप महत्त्व असते. कोल्हापुरातील अंबाबाई देवस्थान साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिहवाडीचे दत्त मंदिर, ज्योतिबा देवस्थान, आदमापूरचे बाळूमामा देवस्थान आहे. या दैवतावर महाराष्ट्र, कर्नाटक व अन्द्रप्रदेश येथील भाविकांची अपार श्रद्धा आहे. या श्रद्धेपोटी दरवर्षी लाखो भाविक कोल्हापुरात येत असतात.
देवस्थानसाठी व सण-उत्सवात फार मोठ्या प्रमाणात नारळ लागतात. मात्र सध्या नारळ आणि वाळलेल्या खोबऱ्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. याची झळ भाविकांच्या बरोबरच खाद्य व्यवसायिकांना बसत आहे. नारळाचे दर २५ रुपये पासून ५० रुपयापर्यंत गेले आहेत. शहाळे ५० रुपयाच्याआत मिळत नाही. वाळलेले खोबरे ३८० रुपये किलो पर्यंत पोहचले आहे.
नारळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात तामिळनाडू आणि केरळमध्ये होते. वाळलेले खोबरे आणि शहाळेही तेथूनच येते. यावर्षी तामिळनाडू आणि केरळ यांसारख्या प्रमुख नारळ उत्पादक राज्यांमध्ये नारळाच्या उत्पादनात घट झाली आहे. नारळ उत्पादनाला फटका बसल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे, असे येथील व्यापारी सांगतात. हवामानातील बदलांमुळे आणि नारळ पिकांच्या वाढत्या वयामुळे उत्पादन घटल्याचे अभ्यासक स्पष्ट करतात.
कोल्हापुरातील बाजारात गतवर्षी १८ रुपये ते ३५ रुपयांना मिळणारा नारळ यावर्षी २५ ते ५० रुपयांना मिळत आहेत. सहा महिन्यापूर्वी २०० रुपये असणारे वाळलेले खोबरे सध्या ३८० रुपये झाले आहे. शहाळे गतवर्षी ३० ते ४० रुपयांना मिळत होते ते आता ५० रुपयांना मिळत आहे. येथील व्यापारी सांगतात वाळलेले खोबरे दिवाळी पर्यंत ५०० रुपये किलो पर्यंत जाईल.