नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी मंगळवारी नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांची सदिच्छा भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी न्यू पॅलेस, कोल्हापूर येथे झालेल्या पहिल्या भेटीनंतर गवई यांनी शाहू महाराजांना दिल्ली भेटीचं निमंत्रण दिलं होतं. दरम्यानच्या काळात गवई सरन्यायाधीशपदी विराजमान झाले असून, त्यानंतर ही भेट विशेष महत्त्वाची ठरली.
या सदिच्छा भेटीत विविध सामाजिक आणि न्यायव्यवस्थेशी निगडित विषयांवर अनौपचारिक पण अर्थपूर्ण चर्चा झाली. यावेळी माजी आमदार मालोजीराजे यांचीही उपस्थिती होती.
खासदार शाहू महाराज यांनी या भेटीत कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्याची गरज स्पष्टपणे मांडली. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्याच्या काही भागांसाठी कोल्हापूर हे भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असून नागरिकांना न्यायासाठी मुंबई किंवा औरंगाबादला जाण्याची वेळ येते. त्यामुळे कोल्हापुरात सर्किट बेंच सुरू झाल्यास सर्वसामान्यांना दिलासा मिळेल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
“आपल्या सरन्यायाधीशपदाच्या कार्यकाळातच कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय व्हावा,” अशी आग्रही मागणी शाहू महाराजांनी यावेळी केली.
पूर्वी कोल्हापूर भेटीत गवई यांनी “ राजर्षी शाहू महाराज यांच्या शिक्षण धोरणांमुळे आमच्यासारख्या बहुजन समाजातील मुलांना शिकण्याची संधी मिळाली. त्याच मुळे आज मी इथवर पोहोचलो,” असे उद्गार काढले होते. त्याचीच पुढची साखळी या सदिच्छा भेटीत दिसून आली. या भेटीद्वारे सामाजिक न्याय, शिक्षण आणि न्यायप्रवेश या मूलभूत मुद्द्यांची चर्चासत्रात उजळणी झाली, हे विशेष.
—————————————————————————————–