मुंबई : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीत विविध खात्यांसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले, मात्र या निर्णयांपेक्षा चर्चेचा विषय ठरली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मंत्र्यांना दिलेली जोरदार तंबी.
बैठकीच्या शेवटी तब्बल २० मिनिटं मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना सुनावलं. “ वादग्रस्त विधानं, आचार आणि कृत्यं यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत. अशा गोष्टींमुळे सरकारची बदनामी होते आणि जनतेचा विश्वास उडतो. ही शेवटची संधी आहे. यानंतर काय कारवाई करायची ते मी करेन,” अशा थेट शब्दांत फडणवीसांनी संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, “आता एकही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मंत्र्यांनी जबाबदारीने आणि नम्रतेने वागणं अपेक्षित आहे. तुमच्या कृती सरकारच्या प्रतिमेला धक्का देत आहेत.”
सध्याचं पार्श्वभूमी
गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमधील काही मंत्री आणि आमदार वादात अडकले आहेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळाच्या अधिवेशना दरम्यान ऑनलाईन रमी गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला. या घटनेमुळे विरोधक आक्रमक झाले असून, कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी होत आहे. याआधीही त्यांनी ‘राज्य सरकार भिकारी आहे’ असं विधान करून वाद निर्माण केला होता.
दुसरीकडे, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या खाजगी बेडरूममधील एक व्हिडीओ समोर आला, ज्यात पैशांनी भरलेली कथित बॅग दिसत होती. या व्हिडीओमुळे सरकार बॅकफूटवर गेलं.
या दोन्ही प्रकरणांमुळे मुख्यमंत्री फडणवीस प्रचंड नाराज असून, मंत्र्यांच्या वर्तनावर संताप व्यक्त केला आहे. सरकारची विश्वासार्हता टिकवण्यासाठी यापुढे कुठलाही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, हे स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलं.
या बैठकीत कृषी, ग्रामविकास, विधी व न्याय विभागासंबंधी विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असले, तरी संपूर्ण मंत्रिमंडळाच्या लक्षात राहिलं ते मुख्यमंत्र्यांचं कठोर भाषण. यामुळे येत्या काळात मंत्र्यांचं वर्तन अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा आहे. विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोल सुरू केला असला, तरी आताच सरकारची अंतर्गत धावपळही वाढली आहे.
———————————————————————————