spot_img
मंगळवार, सप्टेंबर 23, 2025

9049065657

HomeUncategorizedमहिलांची गृहकामाची 'सेकंड शिफ्ट' संपुष्टात येईल तोच खरा महिलादिन: के. मंजुलक्ष्मी

महिलांची गृहकामाची ‘सेकंड शिफ्ट’ संपुष्टात येईल तोच खरा महिलादिन: के. मंजुलक्ष्मी

कोल्हापूर, दि. १७ मार्च: कष्टकरी व नोकरदार महिलांची गृहकामाची सेकंड शिफ्ट संपुष्टात येईल, त्यावेळी खऱ्या अर्थाने महिलादिन साजरा होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केले. शिवाजी विद्यापीठाचे शरण साहित्य अध्यासन, हिंदी अधिविभाग आणि विवेक वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या समारोप समारंभाच्या प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्त्रीस्वातंत्र्याचे विचारपुष्प बंधमुक्त करून स्त्रियांची विविध सामाजिक, कौटुंबिक जोखडांतून मुक्तता करण्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यात आला.

श्रीमती मंजुलक्ष्मी म्हणाल्या, महिला दिनानिमित्त स्त्रीच्या बहुआयामी कार्याचा गौरव करून उत्सव साजरा केला जातो. प्रत्यक्षात मात्र नित्याच्या जीवनात कुटुंब आणि गृहसंगोपनाची जबाबदारी एकट्या महिलेला आपली नोकरी अथवा काम सांभाळत पार पाडावी लागते. कष्टकरी अथवा नोकरदार महिलांची गृहकामाची सेकंड शिफ्ट संपुष्टात येऊन घरातील स्त्री-पुरुष मिळून सामाजिक आणि गृहसंगोपनाची जबाबदारी एकत्रित पार पाडतील तेव्हा खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल.

अध्यक्षीय मनोगतामध्ये कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, स्त्री-पुरुष भेदभाव निर्मूलनाची सुरवात आपल्या घरापासूनच व्हायला हवी. शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी शिक्षणासह सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहेत. विषम सामाजिक पार्श्वभूमीवर देखील शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रियांचे संख्यात्मक आणि गुणवत्तात्मक वाढते प्रमाण हे आश्वासक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यशाळेचा मुख्य विषय ‘भारतीय महिला: जात-वर्ग-लिंगभाव जाणिवा’ असा होता. प्रथम सत्रात स्त्रीवादी साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक प्रा.डॉ. माया पंडित यांनी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिलांच्या वर्तमान स्थितीचे आंतरराष्ट्रीय निर्देशांकाद्वारे विस्तृत वर्णन केले. त्यानंतर कन्नड साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका प्रा. डॉ. शिवगंगा रुम्मा यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. बाराव्या शतकात निर्माण झालेली शरण चळवळ ही केवळ भक्तीपंथ नसून ती जात-वर्ग-लिंगभेदरहित समताधिष्ठित समाज निर्मितीची समग्र चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात चित्रपट समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी महिलांविषयक निवडक आंतरराष्ट्रीय लघुपटांचे प्रदर्शन करून त्यावर चर्चा घडवून आणली. यामध्ये उमेश मालन दिग्दर्शित ‘गोल्डन टॉयलेट’ हा मराठी लघुपट, फजिल रझाक दिग्दर्शित ‘पिरा’ हा मल्याळम लघुपट तसेच समता जाधव दिग्दर्शित ‘सोच सही, मर्द वही’ हा हिंदी लघुपट दाखविण्यात आला.

या एकदिवसीय कार्यशाळेसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील वीसहून अधिक महाविद्यालयांतील ३५० विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि शिक्षकांनी सहभाग नोंदविला. डॉ. चैत्रा राजाज्ञा यांनी स्वागत व पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. तृप्ती करेकट्टी यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी पोतदार व मानसी बोलूरे यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. अंकिता त्रिभुवने यांनी आभार मानले.

कार्यशाळेस व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी व ॲड. अजित पाटील, डॉ. आण्णासाहेब गुरव, डॉ. राजेंद्र सोनकवडे, डॉ. नितीन माळी, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. दिलीप माळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपुरकर, सरला पाटील, राजशेखर तंबाके, बसवराज आजरी, प्रा. सुभाष महाजन, प्रा. अशोक विभुते, प्रा. कल्याणराव पुजारी, विलास आंबोळे, चंद्रशेखर बटकडली, सरपंच शुभांगी पाटील, राजश्री काकडे, उमेश सूर्यवंशी, रेश्मा खाडे सुरेश जांबुरे, विजय पाटील, विभावरी नकाते, कैवल्य शिंदे यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

RELATED ARTICLES
Be the first to write a review

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Advertismentspot_img

Most Popular

- Advertisment -spot_img

Recent Comments