मनोजकुमार काय नव्ह्ते ? अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, पटकथाकार,गीतकार,सिनेमा सम्पादन,देशभक्त, सभ्य नागरिक, सर्व काही होते. त्यांची देशभक्ती व कॅमे-याच्या मागे असलेली त्यांची कलासक्त नजर कधी लपली नाही. देशभक्तीने भारलेले चित्रपट व गाण्यांचे कलात्मक सादरीकरण हा त्यांच्या हीट चित्रपटाचा हीट भाग होता.है प्रीत यहाँ की रीत सदा, मेरे देश की धरती सोना ऊगले ऊगले हिरे मोती, और नही बस और नही, कस्मे वादे प्यार वफा सब बाते है, इक प्यार का नग्मा है, महंगाई मार गई,जीवन चलने का नाम, जिंदगी की ना टूटे लडी, मै ना भुलूंगा, पुर्वा सुहानी आयी रे अशी असंख्य अर्थपुर्ण , भावूक गाणी असलेले त्यांचे शहीद, उपकार, पुरब और पश्चिम, पत्थर के सनम, क्रांती, शोर, रोटी कपडा और मकान असे अनेक चित्रपट चट्कन नजरेसमोर येतात.
मनोज कुमार यांचे मुळ नाव हरिक्रिशन गोस्वामी. पत्नी-शशी गोस्वामी.अबोटाबाद , खैबर पख्तूनवा (आता पाकिस्तान मधे) 24जुलै 1937 मधे जन्म. अबोटाबाद म्हणजे तेच जिथे ओसामा बिन लादेन लपून बसला होता व 2 मे 2011 रोजी अमेरिकेने तिथेच खात्मा केला होता ते! 6 फूटापेक्षा जास्त उंची असलेला हा देखणा अभिनेता, देशाची फाळणी आपल्या डोळ्यादेखत पाहिलेला व अनुभवलेला! मनोज कुमार 10 वर्षाचा असताना म्हणजे 1947 साली त्याची आई गंभीर आजारामुळे इस्पितळात होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मुलाला जन्म दिला होता. बाहेर फाळणीचे दंगे चालू असल्याने डाॅक्टर, नर्स रूग्णाकडे दुर्लक्ष करून लपून बसायचे. आईच्या असह्य वेदना मनोज कुमार यांना पहावत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी दुर्लक्ष करणा-या डाॅक्टर विरूद्ध लाठी चालवली होती. त्यांच्या वडिलांनी परिस्थिती ओळखून गाव सोडले व दिल्लीला निर्वासित छावणीत राहू लागले. मनोजकुमार काम पहात पहात स्टुडिओ तील शूटींग चे साहित्य हलवण्याचे काम करू लागले. शूटींग चा फोकस हिरो यायच्या आधी ॲडजस्ट करून पाहताना तेथील तंत्रज्ञ नेहमी मनोजकुमारना फोकसमधे उभे करायचे. त्यांच्या या आकर्षक छबीवर एकदा दिग्दर्शकाची नजर पडली व त्यांना छोटासा रोल मिळाला. 1957 मधील कांच की गुडीया हा तो चित्रपट. या नंतर मनोजकुमार यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. दिलीप कुमार व कामिनी कौशल हे त्यांचे आवडते कलाकार. 1949 मधे दिलीप कुमार चा ‘शबनम’ त्यांनी अनेक वेळेस पाहीला होता त्यातील दिलीप कुमार चे नाव मनोजकुमार त्यांनी आपल्या फिल्मी अवतारासाठी घेतले.
मनोजकुमारचे राजकारणी पुढारी लोकाशी उत्तम संबंध होते. 1965 साली आलेला शहीद हीटझाला. त्यातली त्यांची शहीद भगतसिंगची भूमिका गाजली. ‘मेरा रंग दे बसंती चोला’, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे है, ए वतन ए वतन हमको तेरी कसम ही गाणी लोकप्रिय झाली. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी बोलताना युद्धाच्या दुष्परीणामावर सिनेमा यायला पाहिजे असे शास्त्रीजी म्हणाले व मनोजकुमार यांनी ‘उपकार’ बनवला. उपकार ने बेस्ट फील्म, बेस्ट डायरेकटर, बेस्ट स्टोरी व बेस्ट संवाद पारितोषिके पटकावली. ‘मेरे देश की धरती सोना ऊगले ‘ तर जणू राष्ट्र गीतच बनले. राजकारणी लोकांच्या संगतीचा फटका ही त्यांना बसला आहे. माजी पंतप्रधान कै इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते पण आणीबाणी विषयी प्रतिकुल मत होते. त्यांना सरकारने डॉक्युमेंटरी बनवण्यास सागितली. प्रख्यात पंजाबी व हिंदी लेखिका अमृता प्रीतम यांचे स्क्रिप्ट होते. ते पाहून मनोजकुमार यांनी अमृता प्रीतम ना फोन करून फैलावर घेतले. त्याचा येवढा परिणाम झाला की अमृता प्रीतम यांनी ते स्क्रिप्ट फाडून टाकण्यास सागितले. परंतू सरकारच्या रोषामुळे परिणाम ही झाला. मनोजकुमार त्याच काळात आपला आधीच गाजलेला शोर पुन्हा रिलीज करत होते. सरकारला ही कुणकुण लागताच दुरदर्शन वर त्यानी तो आधीच दाखवून टाकला. दुसरा चित्रपट ‘दस नंबरी ‘ तर माहिती व सुचना प्रसारण मंत्रालयाने बॅन करून टाकला.

मनोजकुमार ना कारकीर्दीत 7 फिल्मफेअर पुरस्कार, 1992 मधे पद्मश्री तर 2015 मधे दादासाहेब फाळके असे सर्वोच्च पुरस्कार मिळाले. अभिनयाबाबत दिलीप कुमार यांची नक्कल करतात असे म्हणायचे. त्यांचा आयडॉल मात्र दिलीप कुमारच होता. त्यांच्या बरोबर नंतर त्यांनी क्रांती चित्रपट काढून एकत्र काम ही केल.
अशा या मनोजकुमारना शाहरुख खान विरूद्ध बदनामीचा दावा ठोकण्याची वेळ आली होती. शाहरुख खानने ‘ओम शांती ओम ‘ या त्याच्या चित्रपटात मनोजकुमार यांची हाताने चेहरा झाकण्याची लकब विडंबनात्मक रितीने वापरली होती. त्यामुळे संतापलेल्या मनोजकुमार यांनी शाहरुख खान विरूद्ध बदनामीचा दावा ठोकला व नंतर मागे घेण्याचा दिलदारपणाही दाखवला. शाहरुख खानने ही नंतर त्यांची क्षमा मागितली होती. नंतर ‘हाउसफुल’ चित्रपटाच्या रिलीज च्या वेळेस मनोजकुमार यांची ही लकब साजीद खान व रितेश देशमुख यांनी वापरल्यावर ते संतापले परंतू शांत राहिले.
1981 मधे क्रांती हा त्यांचा चित्रपट चालला परंतू नंतर काही फारस भरीव काम झाल नाही. कलयुग और रामायण, संतोष, क्लर्क, देशवासी हे 1991 पर्यंत आलेले चित्रपट फ्लाॅप झाले. मनोजकुमार यांनी आपल्या मुलाला कुणाल गोस्वामीला फिल्म इंडस्ट्रीत सेट करण्याचे प्रयत्न केले पण त्यात यश मिळाल नाही.

मनोज कुमार यांचे निधन होण्यापूर्वी बराच काळ ते आजारी होते. त्यांचा मुलगा कुणाल ग़ोस्वामी म्हणाला “ते खूप काळ आजारी होते. पण शेवटी त्यांना काही त्रास झाला नाही हीच देवाची कृपा म्हणायची.”
“भारत का रहनेवाला हूँ; भारत की बात सुनाता हूँ”, म्हणणा-या या भारताच्या सुपुत्राने शांतपणे वयाच्या 87 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. पंतप्रधान मोदी त्यांना श्रध्दांजली वाहताना म्हणाले “महान अभिनेता और फिल्म निर्माता मनोज कुमार जी के निधन से बहूत दुख हुआ।वह भारतीय सिनेमाके प्रतीक थे,जिन्हे विशेष रूप से उनकी देशभक्ती के लिये याद किया जाता था, जो उनकी फिल्मो मे भी झलकता था। मनोजजी की कार्यो ने राष्ट्रीय गौरव की भावना को प्रज्वलीत किया और यह पीढियों को प्रेरीत करता रहेगा। दुख की इस घडी मे मेरी संवेदनाये उनके परीवारके साथ है । ओम शांती.