कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट अखेर ओटीटीवर दाखल झाला आहे. ११ एप्रिलपासून ही चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या किंवा मोबाइलमध्ये पाहता येणार आहे.
गुरुवारी ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘छावा’विषयी पोस्ट शेअर करण्यात आली. त्यावर स्ट्रीमिंगची तारीख जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून हा चित्रपट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. दोन तास ३७ मिनिटांचा हा चित्रपट आता तुम्ही मोबाइलवर किंवा घरबसल्या पाहू शकता. ‘छावा’ने जगभरात तब्बल ७९०.१४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर भारतातील कमाईचा आकडा ६०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यामुळे २०२५ या वर्षातील हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पोहोचला आहे.
‘छावा’ या चित्रपटाची प्रेक्षक जितक्या आतुरतेने थिएटरमध्ये प्रदर्शनाची वाट पाहत होते, तितकीच उत्सुकता त्यांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजचीही आहे. अखेर तो दिवस उजाडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित हा चित्रपट आजपासून (११ एप्रिल) ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होतोय. १४ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अजूनही देशभरातील काही थिएटर्समध्ये या चित्रपटाचे शोज सुरू आहेत. बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केल्यानंतर आता हा ब्लॉकबस्टर चित्रपट ओटीटीवरही राज्य करण्यास सज्ज झाला आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची, रश्मिका मंदानाने महाराणी येसुबाई यांची आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘छावा’मध्ये आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये यांच्याही भूमिका आहेत.
एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चार ते आठ आठवड्यांच्या (२८ ते ५६ दिवस) कालावधीत तो ओटीटीवर स्ट्रीम केला जातो. हा कालावधी वेगवेगळ्या चित्रपटांसाठी वेगवेगळा असू शकतो. थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असेल तर ओटीटीवर तो लगेच स्ट्रीम केला जात नाही. बॉक्स ऑफिसवर मिळणारा प्रतिसाद, ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत झालेला करार या गोष्टी लक्षात ठेवून एखादा चित्रपट ऑनलाइन कधी प्रदर्शित करायचा, हे ठरवलं जातं. विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाच्या ओटीटी रिलिजची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरील कमाईचे विक्रम मोडल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरील व्ह्युअरशिपचेही विक्रम मोडण्यात यशस्वी ठरणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
————————————–