नवी दिल्ली : प्रसारमाध्यम वृत्तसेवा
ऑनलाइन कंटेंट क्रिएटर्ससाठी लाईव्ह स्ट्रीमिंग आता केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही, तर उत्पन्नाचे मोठे माध्यम ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर YouTube ने ‘Gift Goals’ नावाचे नवीन फीचर अधिकृतपणे लाँच केले आहे. हे फीचर TikTok च्या गिफ्टिंग मॉडेलशी स्पर्धा करणार असून, यामुळे निर्मात्यांना ( क्रिएटर्स ) चाहत्यांकडून भेटवस्तू ( गिफ्ट्स ) मिळवून जलद कमाई करण्याची संधी मिळणार आहे.
गिफ्ट्सचे उत्पन्नात रूपांतर
या फीचर अंतर्गत, प्रेक्षक लाईव्ह स्ट्रीम दरम्यान भेटवस्तू पाठवू शकतात. हे गिफ्ट्स ‘रुबी’ मध्ये रूपांतरित होतात आणि क्रिएटर्सना प्रत्येक १०० रुबीसाठी $ १ इतकी रक्कम मिळते. विशेष म्हणजे, भेटवस्तूंचे रिडेम्प्शन फक्त उभ्या स्वरूपातील (vertical) लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यानच करता येणार आहे.
क्रिएटर्ससाठी विशेष साधनं
हे फीचर YouTube स्टुडिओच्या Earn टॅब मधून सक्रिय करता येते. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे क्रिएटर्स आपल्या लाईव्ह स्ट्रीममध्ये ध्येय (goals) ठरवू शकतात. प्रेक्षक भेटवस्तू देऊन ते ध्येय पूर्ण करू शकतात आणि क्रिएटर चाहत्यांना हेही सांगू शकतो की लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर तो कशा पद्धतीने सेलिब्रेट करणार आहे. पूर्वी अशी सुविधा फक्त सुपर चॅटपुरती मर्यादित होती, परंतु आता ती गिफ्टिंग साठीही उपलब्ध आहे. तथापि, हे फीचर सुरू केल्यास क्रिएटर्सना सुपर स्टिकर्समध्ये प्रवेश मिळणार नाही.
प्रेक्षकांसाठी गिफ्टिंगचा अनुभव
प्रेक्षकांसाठी गिफ्ट देण्याची पद्धतही सोपी ठेवण्यात आली आहे. ते ‘ज्वेल्स’ नावाचे बंडल खरेदी करू शकतात, ज्याची किंमत $०.९९ पासून $४९.९९ पर्यंत आहे. एकदा बंडल खरेदी केल्यानंतर, प्रेक्षक त्याचा वापर करून अनेक वेळा भेटवस्तू पाठवू शकतात. यासह त्यांना आकर्षक अॅनिमेटेड गिफ्ट्स मिळतात, मात्र यात कोणताही कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध नाही.
अतिरिक्त बोनसची ऑफर
यूट्यूबने हे फीचर अधिक आकर्षक बनवण्यासाठी पात्र क्रिएटर्सना प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे. पहिल्या तीन महिन्यांत भेटवस्तूंमधून झालेल्या कमाईवर $१,००० पर्यंत ५० % बोनस देण्यात येणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, हे फीचर केवळ उत्पन्न वाढवण्याचे साधन नाही तर प्रेक्षक आणि क्रिएटर यांच्यातील एंगेजमेंट ( प्रतिबद्धता ) वाढवण्याचा नवा मार्ग ठरणार आहे. TikTok प्रमाणेच YouTube देखील आता लाईव्ह गिफ्टिंगच्या स्पर्धेत उतरले असून, येत्या काळात हे कंटेंट उद्योगात मोठा बदल घडवून आणू शकते.
—————————————————————————————————–






