कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
लेखन म्हणजे एक प्रकारची “ट्रान्झॅक्शन” आहे. तुम्ही तुमचं काहीतरी देत आहात आणि वाचक त्यात काहीतरी घेतात. या देवाणघेवाणीत एक सच्चेपणा असतो, आणि हाच माझ्या लेखनाचा पाया ठरतो. लेखन म्हणजे फक्त कल्पना मांडणं नाही, तर त्यातून लोकांपर्यंत पोहोचणं असतं. जेव्हा लोक तुमचं लेखन वाचतात, तेव्हा एक नातं तयार होतं. हेच मला सगळ्यात जास्त भावतं. कल्पना योग्य शब्दांत उतरवण्याची कला म्हणजे लेखन असल्याचे मत कोल्हापूरचा युवा लेखक पुष्कर मानकर यांनी व्यक्त केले.
प्रसारमाध्यम आयोजित ‘चला बोलूया’ या उपक्रमातील ‘माझा लेखन प्रवास’ या विषयावरील दुसऱ्या संवाद सत्रामध्ये युवा लेखक पुष्कर मानकर बोलत होते. ते सध्या इंग्लंडमधील बर्मिंगहॅम विद्यापीठामध्ये सृजन लेखन या विषयात उच्च शिक्षण घेत आहेत. अॅमेझाॅन वर प्रकाशित ‘फाॅर्बिडन प्लॅनेट’ या इंग्रजीतील विज्ञानवादी कादंबरीचे ते लेखक आहेत. त्यांचे शिक्षण कायदा व विधी शाखेतून ख्राईस्ट युनिर्विसिटी बेंगलोर येथे झाले असून येथेच काही काळ त्यांनी कंटेट रायटर म्हणूनही काम केले आहे.
माझा लेखन प्रवास या संवाद सत्रातील दिलखुलास बातचीत-
माझ्या लेखनप्रवासाची सुरुवात खूपच वेगळी आणि नैसर्गिक पद्धतीने झाली. लोकांशी संवाद साधायचं, त्यांचं ऐकायचं, गोष्टी गोळा करायचं हे नकळत शिकून घेतलं. लहानपणापासूनच मला गोष्टी तयार करायची आणि सांगायची आवड होती. पुस्तकं प्रत्येकाच्या घरी असतात, पण सगळे त्यात रमलेले नसतात. मला वाचनाची फार गरजही वाटली नाही. मला गोष्टी सांगायच्या होत्या, लिहायच्या नव्हे. शाळेत असताना मित्रमैत्रिणींसोबत बसून नवीन स्टोरीज तयार करणं, कल्पना रेखाटणं हे आपसूकच सुरू झालं.
नंतर सोशल मीडियावर आलो, तेव्हा कळलं की लोक आधीच तयार केलेल्या कथा शेअर करतात. पण मला त्यात माझं काहीतरी वेगळं, खास असं भरायचं होतं. त्यातूनच माझं लेखन खरं अर्थानं सुरू झालं. ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर प्रतिक्रिया मिळू लागल्या आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली.
लहानपणापासूनच गोष्टी समजून घेण्याची आणि नवे प्रश्न विचारण्याची सवय लागली होती. अभ्यासात ‘हिस्टरी’ आणि विज्ञान वाचताना एक वेगळाच दृष्टिकोन मिळाला. विशेषतः, काही गोष्टी वेस्टर्न देशांमध्ये कशा वापरल्या जातात, याचा अभ्यास करताना मला त्या मागची प्रेरणा जाणवली.
हळूहळू मला लक्षात आलं की, जर आपण या गोष्टींचा वेगळ्या प्रकारे विचार केला, तर लेखनासाठी नवी दृष्टी मिळू शकते. त्यातून मला काही कल्पना सुचल्या.
लॉकडाऊनच्या काळात वेळ मिळाल्यामुळे लेखनावर अधिक लक्ष द्यायला मिळालं. ऑनलाईन क्लासेस सुरू असतानाच मी पहिल्या लेखासाठी काम सुरू केलं. लिहिताना चुका झाल्या, पण त्यातून शिकायला मिळालं.
लेखन ही एक प्रक्रिया आहे. सातत्याने वाचणं, लिहिणं, आणि सुधारत राहणं. याच प्रक्रियेतून माझा लेखन प्रवास सुरू झाला.
पुढे लेखनाचा कल समजून घेताना मला “कंटेंट रायटिंग” बद्दल कळलं. सुरुवातीला हे काय असतं, याबद्दल फारसं माहिती नव्हतं. पण जसं अभ्यास केला, तसं लक्षात आलं की यात विशिष्ट विषयांवर, विशिष्ट टोनमध्ये लिहायचं असतं.
मी ठरवलं की स्वतःचं लेखनकौशल्य विकसित करायचं, आणि त्यासाठी काही प्रॅक्टिस टॉपिक्स ठरवले. त्याच दरम्यान मी डिजिटल मार्केटिंगमध्येही रस घेतला.
मी बंगलोरमध्ये एका स्टार्टअपमध्ये कंटेंट रायटर म्हणून जॉब घेतला. तिथे आम्ही विविध सेक्टरसाठी कॉन्टेंट तयार करत होतो. त्या अनुभवातून मला व्यावसायिक लेखन कसं करायचं हे शिकता आलं.
लेखन कौशल्य वाढवताना मी जागतिक उदाहरणं पाहायला सुरुवात केली. वेगवेगळ्या देशांतील लेखक काय लिहितात, कशा प्रकारे व्यक्त होतात याचा अभ्यास केला. इंग्रजी कंटेंट रायटिंगमध्ये काही मर्यादा असतात, जसं की शब्दमर्यादा, टोन, प्लॅटफॉर्मची गरज हे सगळं पाळावं लागतं.
कॉमेडी, भावना, माहिती या गोष्टी कशा प्रभावीपणे मांडायच्या हेही वेगवेगळ्या प्रशिक्षकांकडून समजत गेलं. त्यांनी शिकवलं की, तुमचं व्यक्तिमत्त्व आणि तुमच्या शब्दांची शैली यांचा मेळ कसा बसवायचा.
दररोज मी काही ना काही नवीन लिहायचो. शिस्तबद्धपणे जबाबदारीने हे सुरू ठेवलं. त्यामुळे आता माझ्याकडे विविध विषयांवर लिहिलेल्या स्टोरीज जमा झाल्या आहेत.
सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मला पूर्वी सायन्स फारसं आवडत नव्हतं. पण जसजसा लेखनाचा प्रवास वाढला, तसं सायन्सबद्दलची उत्सुकता वाढली आणि आता मी विज्ञान विषयावरही लिहू लागलो आहे.
प्रेरणा मिळवण्याचा प्रवास –
आयर्लंडमध्ये लोकांना नैसर्गिकरित्या गोष्टी सांगण्याची कला अवगत असते. ते उत्तम कथाकथन करताना सहज इंग्रजीत संवाद साधतात. त्यामुळे त्यांच्या साहित्यात आणि संवादात वेगळीच जिवंतता असते.
अशा ठिकाणी गेलं की वेगवेगळ्या शैलीचं साहित्य समोर येतं. जेव्हा मला प्रेरणा हवी असते, तेव्हा मी अशा ठिकाणी जातो. मला असं वाटतं की विज्ञानापेक्षा माणसांच्या गोष्टी, त्यांची जगण्याची पद्धत याचं साहित्य अधिक प्रभावी असतं.
युनायटेड किंगडममध्ये गेल्यावरही मी अनेक ठिकाणी अशा कथा ऐकल्या, त्यातून शिकायला मिळालं. त्यांचं साहित्य प्रचंड आहे, पण त्याबाबत जागरूकता कमी आहे.
माझा स्वतःचा अनुभव सांगायचा झाल्यास मी अलीकडे मराठी साहित्यात रस घेतला आहे. हळूहळू त्यात खोलवर शिरायला सुरुवात केली.
मराठीत लेखन करताना आपला अनुभव हा एक “उपचार” होऊ शकतो. म्हणजेच, आपली गोष्ट इतरांना दिलासा देऊ शकते. माझ्यासाठी हेच लेखनाचं खऱ्या अर्थाने कारण बनलं. मी स्वतःचं लेखन सुरू केलं आणि त्यात सायन्स, माणूस आणि भावना सगळं मिसळून एक नवा दृष्टिकोन मिळवला.
आता मराठीतून लेखन करणं मला अधिक जवळचं वाटतं. पण चांगलं मराठी साहित्य सापडणं, त्यासाठी शोध घेणं, हेच खरं आव्हान आहे.
साहित्याच्या माध्यमातून अनुभव आणि इतिहास –
एखादं साहित्यिक लेखन किती प्रगल्भ आहे, हे त्याच्या गाभ्यात असलेल्या आशयावरून ठरतं मग ते कितीही मोठं किंवा छोटं असो. अनेकदा लहानशा गोष्टींमधूनही जगाची वर्तमान स्थिती का आहे, याचा थेट संदर्भ मिळतो.
इंडियन इंग्लिश साहित्यातील लेखक उदा. किरण नगरकर यांची कथा वाचली, तर त्यातून बारीकसारीक जीवनाचे संदर्भ उलगडतात. त्या कथा केवळ काल्पनिक नसतात, तर त्यात आजच्या वास्तवाची झलक असते.
माझ्याही वाचनप्रवासात प्रेमचंद, रवींद्रनाथ टागोर यांसारख्या लेखकांचं साहित्य वाचताना अनेकदा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संदर्भ स्पष्ट होत गेले. या कथा जणू एक छोटंसं मैदानच असतं, जिथे आपली संस्कृती विकसित होताना दिसते.
मी विज्ञान शाखेतील असल्यामुळे सुरुवातीला विज्ञानाकडेच जास्त ओढा होता. पण नंतर जाणवलं की, शास्त्रीय लिखाणात जितकी माहिती असते, तितकी “मनाची भावना” किंवा “इतिहासाची जाणीव” फारशी दिसत नाही.
साहित्य वाचताना मात्र, अनेकदा त्या कथा जरी काल्पनिक वाटल्या तरी, त्यातून आपल्या इतिहासाचे पदर उलगडले जातात. जर तुम्हाला एखाद्या क्षणी वाटलं की विज्ञान योग्य आहे, पण त्यात “तुमचं स्वतःचं” काहीच दिसत नाही ना तुमचा अनुभव, ना तुमचा इतिहास तर त्या क्षणी साहित्याकडे वळा. तिथे कदाचित एखाद्या परक्या कथेतही काहीतरी आपलंसं सापडेल.
किरण नगरकर मला त्यामुळे भावतात, कारण त्यांनी लेखनाची सुरुवात मराठीतून केली आणि नंतर इंग्रजीत लेखन केलं. असाच एक इंग्लिश कवी आहे त्याची कविता व्यवस्थित रचलेली, फॉर्मल आहे. भारतात इंग्रजी ही भाषा शिक्षणाचं साधन असली तरी, अनेकदा फक्त पृष्ठभागावरच संपर्क असतो.
थोडक्यात विचार :
-
साहित्य कोणत्या भाषेत आहे यापेक्षा, तो अनुभव किती प्रामाणिक आहे हे महत्त्वाचं.
-
लोक इंग्रजीकडे आकर्षित होतात, पण त्यांचा त्या भाषेशी “कनेक्ट” वरवरचा असतो.
-
स्थानिक अनुभवांनाही जागतिक महत्त्व मिळू शकतं फक्त त्याकडे बघायची दृष्टी हवी.
- ——————————————————————————————