कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
राज्यातील शासकीय रेशन दुकानांमधून दरमहा नियमितपणे स्वस्त धान्य घेणाऱ्या लाभार्थ्यांना आता ‘ई-केवायसी’ (e-KYC) अनिवार्य करण्यात आले आहे. अनेक वेळा आवाहन करूनही अद्याप अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता पुरवठा विभागाने कडक पवित्रा घेत, ३१ जुलै ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. या मुदतीपर्यंत ई-केवायसी न करणाऱ्यांचे सप्टेंबर पासून रेशन बंद करण्यात येणार आहे.
ई-केवायसी : ई-केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर, ज्याद्वारे आधार क्रमांक, अंगठा ओळख (बायोमेट्रिक) व अन्य तपशील रेशन कार्डाशी लिंक केले जातात. यामुळे बनावट कार्डधारक ओळखले जातात आणि खरी गरजूंना लाभ देता येतो.
राज्यात ई-केवायसी मोहीम काही महिन्यांपासून सुरू आहे. तरीही अनेक लाभार्थी रेशन दुकानात धान्य घ्यायला येतात पण ई-केवायसी प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे शासनाचा लाभ चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून पुरवठा विभागाने आता स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे – “नो केवायसी – नो रेशन!” ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. ई-केवायसी न केल्यास सप्टेंबर पासून रेशन मिळणार नाही. धान्य वितरण कायमस्वरूपी थांबवण्यात येईल. याचा फटका लाखो लाभार्थ्यांना बसू शकतो
नागरिकांनी काय करावे : आपले रेशन कार्ड जवळच्या रेशन दुकानात घेऊन जावे. आधार कार्ड आणि अंगठा (बायोमेट्रिक) तपासणी करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. ३१ जुलैपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर सप्टेंबरपासून आपल्याला रेशन मिळणार नाही



