इमारत रस्ते, पूल, कालवे बांधणारे इंजिनियरचे योग आपण ज्यावेळी पाहतो. त्यावेळी असे दिसून येते की, कुंडली मध्ये मंगळ व नेपच्यून यांचे कोणतेही शुभ किंवा अशुभ दृष्टीयोग झालेले असतात. कोणत्याही वरच्या दर्जाच्या इंजिनियर्सच्या बुद्धिमत्तेत कल्पकता व आपल्या कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे ज्ञान असावेच लागते व त्याचबरोबर जबाबदारीही घ्यावी लागते.
जीवनातील किंवा आपल्या कार्यामधील जबाबदारी स्वीकारून धाडसाने येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचा गुणधर्म मंगळाचा आहे म्हणून कुंडली मध्ये मंगळ बलवान असावा लागतो. मंगळा शिवाय दुसरा ग्रह म्हणजे शनी, याची ही तितकीच या योगामध्ये साथ लागते. कारण इमारत, लाकूड, दगड, माती, विटा या वर शनीचा अंमल असतो. तसे पाहिले तर इमारती, पूल वगैरे बांधकामास लागणारे जे यंत्र साहित्य लागते यावर देखील शानिचीच सत्ता असते. म्हणून ह्या योगाचा अभ्यास करीत असताना शनीची अवस्था पाहणे जरुरीचे आहे. सहसा शनी अग्नी किंवा वायू राशीमध्ये असावा. तसे पाहिले तर या लोकांना गाणीताचेही चांगले ज्ञान असावे लागते व त्यासाठी कुंडलीमध्ये मंगळ-बुध युती किंवा ते परस्परांच्या शुभयोगात असावे लागतात.
ज्यावेळी आपण इलेक्ट्रिक इंजिनियर या क्षेत्राचा अभ्यास करतो या वेळी हर्षलला जास्त महत्व द्यावे लागते. शनीचे महत्व नाही. पण, इथे सुद्धा मंगळ-बुध तितकेच महत्वाचे आहेत. विद्युत कामे करणारे इंजिनियर, पाॅवर हाऊसचे मॅनेजर किंवा रेल्वे वर्कशॉप मधील इंजिनियर या योगांसाठी हर्षलला महत्व आहे. कारण या सर्वांचा कारक हर्षल आहे. परंतु आपण ज्यावेळी आगबोट, लष्करी जहाजे, समुद्रामधील कामे काणाऱ्या इंजिनियरचा विचार करतो त्यावेळी नेपच्यून महत्वाचा असतो. कुंडलीमध्ये नेपच्यून केंद्र त्रीकोनामध्ये असून त्यावर बुध मंगळ व शनीचे शुभयोग असावे लागतात. कर्क, मीन, वृश्चिक या जलराशी या योगास फारच अनुकूल ठरतात. वैमानिक इंजिनीयरांना सुद्धा नेपच्यूनचेच शुभयोग असावे लागतात. पण नेपच्यून जलराशीपेक्षा वायुराशीमध्ये असून केंद्रामध्ये असणे अधिक महत्वाचे आहे. जर नेपच्यून अग्नी किंवा पृथ्वी राशीमध्ये असेल तर त्यावर वायू किंवा जलराशीतील ग्रहांचे शुभयोग होणे खूप महत्वाचे असते.
आपण रेडीओ याचा विचार करतो त्यावेळी प्लुटोचा विचार करावा लागतो. प्लुटो शुभस्थानी असावा व त्याच्यावर शनी, मंगळ, बुध यापैकी कोणत्याही एका ग्रहाचा तरी शुभयोग होणे गरजेचे आहे. इलेक्ट्रिक इंजिनीयरास यश मिळण्यास कुंडलीमध्ये हर्षल बरोबर चंद्र , शुक्र, गुरुचे शुभयोग असावेत. अन्यथा यश मिळत नाही. जर हर्षल बरोबर शनी, मंगळ, रविचे योग बनत असतील तर या क्षेत्रामध्ये अशी व्यक्ती खूपच अभागी ठरते.
सिव्हील इंजिनियरच्या बाबतीत विचार करता शनी बरोबर चंद्र, गुरु, शुक्राचे शुभयोग असावे लागतात. पण आपण या क्षेत्रामध्ये यांत्रिक मदत घेत असतो. म्हणून कुंडलीमध्ये मंगळ अनुकूल असावा लागतो व विद्युतशक्तीची मदत घ्यावी लागते म्हणून कुंडलीमध्ये हर्षल सुद्धा बलवान असावा लागतो.
तसे पहिले तर इंजिनियरचा योग कुंडलीमध्ये पाहत असताना शुभ ग्रहांच्या दृष्टीयोगाबरोबर पापग्रहांचे देखील शुभदृष्टीयोग असावे लागतात.
- जोतिषविशारद- मानसी पंडित
———————————————————————————————-



