कोल्हापूर : प्रसारमाध्यम न्यूज
कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने येत्या २४ तासांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांमध्ये वेगवान वाऱ्यांसह ( ३० ते ४० किमी/तास ) जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये तापमानात वाढ; वेगवान वाऱ्यांचा इशारा
कोल्हापूर जिल्ह्यात मागील २४ तासांमध्ये पावसाची उघडीप राहिली. यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदवली गेली असून, तापमान ३०.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले. पुढील २४ तासांमध्ये ते ३१ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला असून, वेगवान वाऱ्यांची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यात वादळी वातावरणाची शक्यता
सोलापूरमध्ये मागील २४ तासात ०.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. पुढील २४ तासांत या तापमानात वाढ होऊन ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानासोबतच गडगडाटी वादळांची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथेही यलो अलर्ट जारी केला आहे.
सांगलीत हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज
सांगली जिल्ह्यातही मागील २४ तासांत पावसाची उघडीप राहिली होती. मात्र पुढील २४ तासांत ढगाळ आकाश आणि विजांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. येथेही यलो अलर्ट देण्यात आला आहे.
राज्याच्या या भागांमध्ये अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शेतकरी, दुचाकीस्वार आणि मोकळ्या भागात वावर करणाऱ्यांनी विजांचा धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेचे उपाय योजावेत.
———————————————————————————————-